

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील एन. एस. सोटी लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर पूर्ववैमनस्यातून विष्णू सतीश वडर (वय 23, रा. वडर कॉलनी) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले.
आर्यन हेमंत पाटील (वय 23, रा. रत्नदीप हौसिंग सोसायटी, कुपवाड) आणि आदित्य प्रमोद वालकर (21, रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आर्यन पाटील हा दीड वर्षापूर्वी छायाचित्रकार म्हणून काम करत होता. कॉलेज कॉर्नर परिसरात तो सतत येत होता. विष्णू वडर आणि आर्यन यांच्यात दीड वर्षापूर्वी रागाने बघण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर ‘रागाने का बघितलास?’ म्हणून त्याच्यावर एन. एस. लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात 1 जुलै 2024 रोजी चाकूने हल्ला करण्यात आला होता. याबाबत विष्णू वडर, पृथ्वीराज कलकुटगी आणि मंथन नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा त्यांच्यात वाद उफाळून आला होता. दोघांमध्ये सतत धुसफूस सुरू होती. दीड वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा आर्यन पाटील याला राग होता.
लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर रॉयल टॉवरसमोरील चौक म्हणजे टोळक्यांचा अड्डा बनला होता. तेथे विष्णू वडर साथीदारांबरोबर सतत थांबत होता. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर तेथे वर्दळ होती. याचदरम्यान पूर्वीच्या वादातून आर्यन आणि त्याचा साथीदार आदित्य वालकर यांनी पूर्वीच्या भांडणातून चिडून विष्णू याच्याशी भांडण काढले. त्यांच्यात वाद सुरू असताना त्यांनी चाकूसारख्या धारदार शस्त्राने विष्णूवर हल्ला चढवला. डोक्यात, पोटावर, पाठीवर, हातावर आणि मांडीवर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी होऊन विष्णू खाली पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
भरदिवसा घडलेला हा हल्ल्याचा थरार पाहून परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली. दोन्ही कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनी पटापट शटर खाली ओढली. हल्लेखोर पसार झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू याला वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासासाठी दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीवकुमार झाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन माने यांनी तातडीने दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना केली. गुन्हे अन्वेषणचे पथकही मागावर होते. विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी आर्यन देशिंगकर व प्रशांत माळी यांना संशयित दोघांची माहिती मिळताच, घटनेनंतर अवघ्या दोन तासात कुपवाड परिसरातून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी प्राथमिक चौकशीत पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली आहे. सहायक निरीक्षक चेतन माने अधिक तपास करत आहेत.
नवीन वर्षाची सुरुवात खुनाने
गेल्या वर्षभरात सांगलीसह जिल्ह्यात खुनाच्या अनेक घटना घडल्या. यासंदर्भात विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस दलावर आरोप केले होते. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जेथे हल्ला झाला तेथेच खून
दीड वर्षापूर्वी संशयित आर्यन पाटील याच्यावर ज्या चौकात हल्ला झाला होता, त्याच चौकात विष्णूवर वार करून त्या हल्ल्याचा बदला घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॉलेज कॉर्नर परिसरात याची चर्चा सुरू होती.
थरार कॅमेर्यात कैद
एन. एस. सोटी लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील सीसीटीव्ही कॅमेर्यात हा हल्ल्याचा थरार चित्रीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे.