Poultry industry: 'पोल्ट्री'ला 'कृषी' दर्जा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा

खानापूर तालुका पोल्ट्री असोसिएशनचे पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांना साकडे
Poultry industry: 'पोल्ट्री'ला 'कृषी' दर्जा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा
Published on
Updated on

विटा : महाराष्ट्र शासनाने कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायाला 'कृषी समकक्ष दर्जा' देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या तातडीने अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आदेश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती खानापूर तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.

खानापूर तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब काटकर यांनी मुंबईतील मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील पोल्ट्री व्यवसायाच्या अडीअडचणी आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विटा आणि खानापूर तालुक्यामध्ये राज्यातील सर्वात जुना आणि मोठा पोल्ट्री उद्योग असून या व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विट्यात शासनाच्यावतीने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मी स्वतः आशियातील सर्वात मोठे पोल्ट्री उद्योगाचे केंद्र असलेल्या नामक्कल (तमिळनाडू) येथील असल्याने मला या उद्योगातील समस्यांची पूर्ण जाणीव आहे. विट्याचा पोल्ट्री उद्योग आणि कवठेमहांकाळ येथील शेळीपालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी स्वतः दोन दिवस विट्यात मुक्कामी येईन’, असे डॉ. रामास्वामी यांनी सांगितल्याचे जाधव यांनी नमूद केले.

यावेळी संघटनेच्यावतीने मंत्री पंकजा मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये ३१ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार कुक्कुटपालन व्यवसायासाठी वीज दर आकारणी 'कृषी इतर' ऐवजी 'कृषी' वर्गवारीनुसार करण्यात यावी, तसेच कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धनासाठी सौरऊर्जा पंप व संच उभारण्याकरिता कृषी व्यवसायाप्रमाणेच अनुदान देण्यात यावे, या दोन मुख्य मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.

पंकजा मुंडे यांनी पत्रावर तातडीने शेरा मारला. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून, पोल्ट्री विभाग अधिक सक्षम करण्यासाठी लेखी खुलासा आणि उपाययोजना सादर कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. मंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी लवकरच होईल, अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news