

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कवलापूर (ता. मिरज) येथील 160 एकर जागेवर विमानतळ उभारणीस बुधवारी तत्वतः मान्यता देण्यात आली. मंत्रालयातील बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला. औद्योगिक विकास महामंडळाकडे असलेली ही जागा विमानतळ विकास प्राधिकरणाकडे हस्तांतर केली जाईल. प्राधिकरणाने कार्गो विमानतळासाठी सर्वेक्षण करावे, जादा लागणार्या जमिनीचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री सामंत यांनी दिले.
मंत्रालयातील बैठकीला शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर, खासदार संजय पाटील उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी ऑनलाईन सहभागी झाले होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, अप्पर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, अवर सचिव किरण जाधव, वसुंधरा जाधव (सांगली), मुख्य अभियंता सुभाष तुपे (मुंबई), महाराष्ट्र विमान प्राधिकरणचे अधिकारी आर. ए. नाईक उपस्थित होते.
कवलापूर विमानतळ हे जुने आहे. त्याचे पुनरुज्जीवन करायचे आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा कार्गो विमानतळासाठी अधिक आग्रही आहोत, अशी भूमिका आमदार बाबर यांनी मांडली. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या पिकांना जगभर बाजार आहे. कवलापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर निर्यात शक्य आहे. कवलापूर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीला चालना मिळणार आहे, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
देवगड, रत्नागिरीचा हापूस आंबादेखील याच विमानतळावरून जगभर पाठवणे शक्य होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
संजय पाटील म्हणाले, कवलापूर येथील जागा खासगी कंपनीला विकली जावू नये, यासाठी पाठपुरावा केला होता. जिल्ह्याच्या विकासासाठी येथे विमानतळच झाले पाहिजे. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून कवलापूर विमानतळासाठी आवश्यक ती मदत मिळेल.
विमानतळ बचाव कृती समितीचे पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर यांनी सांगितले की, सांगलीची जनता आजचा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवेल. विमानतळ विकासाच्यादृष्टीने एक महत्वाचे पाऊल पडले आहे. अजून मोठा पल्ला बाकी आहे. सांगली व कवलापूर परिसरातील जनता या विकासाला साथ देईल. एकजूट यशस्वी होईल.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, रस्ते वाहतूक महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.
आमदार अनिलराव बाबर म्हणाले, जिल्ह्यात फळपीक, भाजीपाला शेती मोठी आहे. कवलापूर विमानतळ झाल्यास कृषी माल निर्यातीने जगाचा बाजार जवळ येईल. दक्षिण महाराष्ट्रात सर्वाधिक विमान प्रवास सांगली जिल्ह्यातील लोक करतात. त्यामुळे कवलापूर विमानतळाची गरज आहे.