कुंभोज; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 13 महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने 14 कोटी 30 लाखांचा निधी जाहीर केला आहे. पण, राज्यात शिक्षणाची पाळंमुळं ज्यांनी रुजवली, ज्यांनी गरिबांना शिक्षणाची दारं खुलं केली, त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुंभोज गावातील शाळेचा मात्र राज्य सरकारला विसर पडला आहे. याही शाळेला शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी यांच्यासह अनेक महापुरुषांनी शिक्षणातून समाजकार्य केले, परिवर्तन केले. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य लाखमोलाचे आहे. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा, सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरोधात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बंड पुकारले. त्यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रयतेतल्या बहुजन, गरीब मुलांना शिक्षण मिळाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या त्यांच्या आजोळी झाला. येथील ब्रिटिशकालीन शाळा असलेल्या कुमार विद्या मंदिर या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेतील रजिस्ट्ररमध्ये याची नोंद मोडीलिपीमध्ये आहे. कर्मवीरांनी ज्या शाळेतून शिक्षणाचे धडे गिरवले त्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावातील कुमार विद्या मंदिर या शाळेची दुरवस्था झाली आहे. या शाळेलाही मदत मिळणे गरजेचे आहे.
1. राजर्षी शाहू महाराज जिल्हा परिषद शाळा हिंदुराव घाडगे विद्यामंदिर, कागल., 2. महात्मा फुले – ज्योती सावित्री इंटरनॅशनल, जि. प. शाळा खानवडी जि. पुणे., 3. सावित्रीबाई फुले – जि. प. केंद्रीय प्राथमिक विद्यालय नायगाव जि. सातारा., 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रतापसिंह हायस्कूल, सातारा., 5. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जि. प. उच्च माध्यमिक शाळा क्र. 1 वाटेगाव, जि. सांगली., 6. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर – जि.प. उच्च माध्यमिक शाळा, येडेमच्छिंद्र, जि. सांगली., 7. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज -जि. प. शाळा क्रमांक 1 पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक., 8. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – जि. प. उच्च प्राथमिक शाळा, चौंडी, जि. अहमदनगर., 9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – जि. प. शाळा, मोझरी, जि. अमरावती., 10. संत गाडगेबाबा- जि. प. प्राथमिक शाळा शेडगाव, जि. अमरावती., 11. शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख – जि. प. प्राथमिक शाळा पापळ, जि. अमरावती., 12. महर्षी धोंडो केशव कर्वे जि. प. प्राथमिक शाळा मुरूड, जि. रत्नागिरी., 13. साने गुरुजी जि. प. प्राथमिक शाळा पालगड, जि. रत्नागिरी.
कर्मवीर अण्णांच्या शाळेलाही खर्या अर्थाने मदतीची गरज आहे. त्यामुळे महापुरुषांच्या शाळांच्या विकासाची जी योजना राज्य सरकार राबवते आहे, त्या यादीत कुंभोजच्या अण्णांच्या शाळेचं नाव समाविष्ट करावे. या शाळेला मदत मिळाली तर या शाळेला नवे रूप येईल.
– सुभाष मसुटगे, संचालक, कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संकुल, कुंभोज.