कडेगाव; रजाअली पिरजादे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सरकार सोबत जाऊन उपमख्यमंत्री झाले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, मात्र असे असले तरी याचा कोणताही परिणाम कडेगाव तालुक्यावर झालेला नाही. मुळात या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे. आमदार अरुणअण्णा लाड व युवा नेते शरद लाड हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतात. मात्र, त्यांनी आपला पाठिंबा शरद पवार यांना दिला आहे. त्यामुळे या तालुक्यात बदलत्या राजकीय वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. येथील राजकीय समीकरणे जैसे थेच राहणार आहेत. या ठिकाणी बलाढ्य काँग्रेस आणि भाजप म्हणजेच कदम आणि देशमुख गट असाच राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
कडेगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी या ठिकाणी सलग तीस वर्षेहून अधिककाळ आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र, माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम हे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.
कडेगाव तालुका आणि कडेगाव – पलूस मतदारसंघात डॉ. विश्वजित कदम अर्थात काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. येथे भाजपचीदेखील मोठी ताकद आहे. मात्र, मुळात राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी कमी आहे. आमदार अरुण लाड व युवा नेते शरद लाड यांनी आपला पाठिंबा शरद पवार यांना जाहीर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम हे या ठिकाणी सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात त्यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. सांगली जिल्हा काँग्रेसचे नेतृत्वही आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले आहे. कर्नाटक काँग्रेस विजयामुळे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा सांगली येथे करण्यात आलेला विशेष सत्कार कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांचे राजकीय वजन वाढले आहे.
या तालुक्यात व मतदारसंघात आजपर्यंत कदम विरुद्ध देशमुख म्हणजेच काँग्रेस विरुद्ध भाजप अशा राजकीय लढाया रंगल्या आहेत. डॉ. पतंगराव कदम आणि संपतराव देशमुख यांचा राजकीय संघर्ष सर्वत्र गाजला. आजही लढाई सुरू आहे. डॉ. विश्वजित कदम आज या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत, तर त्यांच्या विरोधात संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह देशमुख संघर्ष करीत आहेत. देशमुख आज भाजपमध्ये आहेत. पृथ्वीराज देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम हे नेतृत्व करीत आहेत.
कदम – देशमुख यांच्या राजकीय संघर्षात या तालुक्यांचा आणि मतदारसंघाचा मोठा विकास झाला आहे. सहकाराचे जाळे मतदारसंघात विणले गेले आहे. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने देशमुख गट राजकीयदृष्ट्या आघाडीवर दिसतो. विकासकामांतून कदम गट आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार अरुण लाड मतदारसंघात सक्रिय आहेत. विविध विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे.
तालुक्यात केवळ अरुण लाड व शरद लाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची शरद पवार गटाची ताकद आहे. अजित पवार गटाची ताकद तालुक्यात काहीच नसल्याने राष्ट्रवादी पक्षाचा लाभ राजकीयद़ृष्ट्या केवळ काँग्रेसला म्हणजेच महाविकस आघाडीला होणार आहे. तरीही ऐनवेळी राजकीय परिस्थितीत बदल झाल्यास शरद लाड यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
आगामी 2024 निवडणुकीच्यादृष्टीने भाजपचे उमेदवार म्हणून संग्राम देशमुख यांचे नाव या आधीच जाहीर करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्वजित कदम निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाच्या कालावधीत केलेली विकासकामे आणि केंद्र व राज्यात भाजप सत्ता असल्याने त्याचा फायदा संग्रामसिंह देशमुख यांना होण्याची शक्यता आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी मागील 30 वर्षांत तालुक्याचा विकासकामांनी केलेला कायापालट व काँग्रेसकडून डॉ. विश्वजित कदम यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती घेऊन रणांगणात उतरणार आहेत. याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. एकंदरीत या तालुक्यात काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये भाजपचेच मोठे आव्हान राहणार आहे.