

सांगली : पुढारी वृत्तसेवा
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ६५ हून अधिक शेतकरी व गुंतवणूकदारांची सुमारे ५६ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या पावणेआठ वर्षांपासून फरारी असलेल्या मुख्य संशयिताला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. प्रतीक दीपक कांबळे (वय ३४, रा. शिरगाव रोड, नागठाणे, ता. पलूस) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तासगाव पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये शिवाजी भानुदास चव्हाण (रा. जुना कवठे रोड, चिखलगोठण, ता. तासगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 'स्वराज्य अॅग्रो' कंपनीशी संबंधित संशयितांवर फसवणूक, अपहार आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. कांबळे याने 'स्वराज्य ॲग्रो' कंपनी स्थापन केली होती.
कडकनाथ कोंबडी पालनातून आर्थिक फायदा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांकडून गुंतवणूक करून घेतली. मात्र, करारातील अर्टीचे पालन न करता, मुद्दल वा परतावा न देता गुंतवणूकदारांची ५६ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित प्रतीक कांबळे पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते. दरम्यान, संशयित प्रतीक कांबळे हा नागठाणे येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक रमेश कोळी आणि हवालदार संदीप मोरे यांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सांगोला, मेटफळे, आटपाडी, विटा, कुंडल आणि वाळवामार्गे त्याचा पाठलाग केला. नागठाणे येथील शिरगाव रस्त्यावरील राहत्या घरी तो पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.