

सांगली : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात एका २७ वर्षीय तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद जगन्नाथ मगदूम (वय ३०, रा. ४६८, गावभाग, मारुती चौक, सांगली) हे बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. त्यांची ओळख संशयित शर्वी थोडपुन्नरू हरेकृष्ण (वय २७, रा. फ्लॅट नं. ३०२, रत्ना रेसिडेन्सी, अण्णा सतगोंडा पाटील नगर, एस.टी. स्टँडजवळ, सांगली) हिच्याशी झाली होती. शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या शर्वीने फिर्यादींना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रसाद मगदूम यांनी ३ जुलै २०२५ ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मारुती चौक, गावभाग येथे चार ते पाच वेळा तिच्याकडे एकूण ११ लाख ५० हजार रुपये गुंतवले. मात्र, रक्कम घेतल्यानंतर संशयित तरुणीने कोणताही नफा दिला नाही.
तसेच मूळ मुद्दल परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मगदूम यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित शर्वी हरेकृष्ण हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.