

Ajit Pawar Death In Plane Crash: आज सकाळी अख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगरा कोसळला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. याबाबत बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे.
अजित पवारांचा विमान अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षीदर्शी महिला म्हणतात, 'पहिल्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हे विमान फिरून परत येत होतं. त्यावेळी ते खूप खाली खाली येत होतं. आम्ही बाहेरच होतो. धावपट्टीच्या वर जायच्या ऐवजी ते बाजूला क्रॅश झालं. क्रॅश झाल्यानंतर ते पलटी झालं अन् मोठा स्फोट झाला. ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळी आम्ही बाहेरच होतो. पावणे नऊच्या आसपास ही घटना घडली. आम्ही खूप घाबरलो होतो. आमच्या घराच्या पाठीमागेच त्या विमानाचे पार्ट पडलेले.'
त्या पुढे म्हणाल्या, 'आम्ही विमानतळ प्रशासनाला कळवलं. त्यानंतर ते आले एवढा मोठा जाळ झाला होता आम्ही पाण्याच्या बादल्या नेल्या मात्र आम्ही काहीच करू शकलो नाही. शेजारीच एक मृतदेह पडला होता. तो कोणाचा मृतदेह होता हे आम्हाला माहिती नव्हतं. पण नंतर कळलं की तो मृतदेह दादांचा होता. शीर वेगळं होतं धड वेगळं होतं. हातपाय फुगले होते. आम्ही ब्लँकेट दिले. त्यांच्या हातात काहीतरी होतं त्यावरून माणसांनी ओळखलं की हे दादाच आहेत. ही घटना खूप दुर्दैवी आहे. त्यात पाच मृतदेह होते. दोन बाहेर पडलेल्या तर तीन आत अडकून पडल्या होत्या. विमानाला लागेली आग जवळपास अर्धा तास होती.'
अजित पवार यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची चवच गेली असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी अजूनही यावर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला अशी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे शब्दाचे पक्के होते असेही ते म्हणाले.