राज्यातील पोलिस प्रशासन नेमके करते तरी काय? : जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. असे असताना राज्यातील पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आ. जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना आ. पाटील यांनी पाठविले आहे.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषणावह नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मुंबईतील चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात घडलेली मुलीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करुन सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे.

महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम

महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी आशाही आ. पाटील यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news