मारुती पाटील
ईश्वरपूर : गेली नऊ वर्षे उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणापासून व कारभारापासून अलिप्त असलेल्या आ. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर पालिकेत पुन्हा लक्ष घातले आहे. सोमवारी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या पदग्रहणानिमित्त नगरपालिकेत आलेल्या आ. जयंत पाटील यांनी तब्बल अडीच तास बैठक घेत पालिकेच्या कारभाराचा आढावा घेतला. यापुढे ते स्वतः नगरपालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणार असल्याचे दिसत आहे.
सन 2016 साली नगरपालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 35 वर्षांची सत्ता उलथवून टाकत विकास आघाडीने सत्ता मिळवली होती. तेव्हापासून पाच वर्षे आ. जयंत पाटील हे नगरपालिकेत फिरकले नव्हते. विकास आघाडीचा सत्ताकाळ संपल्यानंतर पालिकेत प्रशासक आल्यानंतर आ. जयंत पाटील हे नगरपालिकेत आले होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात पालिकेतील काही विकास कामांची उद्घाटने त्यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी नगरपालिकेत लक्ष घातले नव्हते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाने 30 पैकी 22 जागा जिंकत पुन्हा पालिकेत सत्ता मिळवली. सोमवारी आनंदराव मलगुंडे थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले. सोमवारी नगराध्यक्ष मलगुंडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पदग्रहण सोहळा झाला. त्यानंतर आ. पाटील यांनी नगराध्यक्ष मलगुंडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, तसेच सर्व खातेप्रमुख यांची आढावा बैठक घेतली. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही बैठक दोन वाजता संपली. या बैठकीत आ. जयंत पाटील यांनी सर्व खात्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या. यापुढील काळातही आ. जयंत पाटील हे स्वतः नगरपालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवून असतील.