

ईश्वरपूर : आज मुख्यमंत्री माझ्यावर काही बोलले नाहीत त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. तुम्ही पालिकेची सत्ता द्या मग विकास कामांसाठी निधी देता म्हणता, मग गेली नऊ वर्षे तुम्ही काय करत होता; असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी उरूण-ईश्वरपूर येथील जाहीर सभेत केला. राज्य शासनाकडून निधी कसा आणायचा हे मला चांगलं माहीत आहे, असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी आ. पाटील यांनी विरोधी गटाकडील उमेवारांच्या प्रतिज्ञापत्रातील गुन्ह्यांच्या कलमांचा पाढा वाचला.
येथील यल्लामा चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे व उमेवारांच्या प्रचार सभेत आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी आनंदराव मुलगुंडे, दिलीप पाटील, देवराज पाटील, प्रतीक पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, प्रा. शामराव पाटील, भगवानराव पाटील, अरुणादेवी पाटील, नंदकुमार कुंभार, राजेंद्र शिंदे, विजय कुंभार, ॲड. मनीषा रोटे, महेश पाटील, अरुण कांबळे उमेदवार उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू, पिण्याच्या पाण्याची नवीन योजना, उद्यान विकास, क्रीडांगणे विकास, अभ्यासिका, मोफत मंगल कार्यालय व्यवस्था, गरिबांना घरकुल, वाहनतळ, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना 10 लाखाचे कर्ज, शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारु.
सुधारीत पाणी पुरवठा योजनेसाठी मी पाठपुरावा करुन 124 कोटीची योजना मंजुर करुन आणली आहे. पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे हे जयंत पाटील यांना चांगले माहीत आहेे. ईश्वरपूर शहराची 9 वर्षे वाया गेली आहेत. या शहरासाठी 9 वर्षात नवीन काय आणले, शहराचा विकास काय केला, हे प्रश्न नागरिक विचारत आहेत. माझ्यावर टीका करायची, हा महत्त्वाचा कार्यक्रम विरोधकांनी राबविला आहे. मला गल्ली-बोळात फिरायची वेळ आली आहे, असा माझ्यावर आरोप होत आहे. पण दर निवडणुकीत गल्ली-बोळातून फिरतो त्यामुळे लोकांचे प्रश्न कळतात. गल्ली-बोळात आणि जमिनीवर राहायचा माझ्यावर संस्कार आहे. त्यामुळे तर या शहराने मला सात हजारपेक्षा अधिक मताधिक्य दिले. मला विरोधकांकडून जेवढ्या शिव्या जास्त, तेवढी आम्हाला मते जास्त मिळतात.
दिलीप पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणाची पातळी खालावली आहे. जे सत्तेपुढे झुकत नाहीत त्यांच्या चौकशा लावण्याची, तुरुंगात टाकण्याची व संस्था बंद पाडण्याची धमकी देण्याची प्रथा सुरू झाली. मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असतानाही हा प्रयोग झाला. बँकेच्या अनेक चौकशा झाल्या. ईडीची धाड पडली मात्र त्यांना चिंधीही सापडली नाही. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मुलगुंडे, पुष्पलता खरात, शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे, अरुण कांबळे, शाकिर तांबोळी, अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, शहाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.