

इस्लामपूर : राज्याप्रमाणे इस्लामपूर शहरातही मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून काही प्रभागांतील मतदार नावे दुसऱ्या प्रभागात टाकली आहेत. या सर्व प्रकारची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
इस्लामपूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीतील घटक पक्ष सोबत आले तर त्यांनाही घेऊ, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, राजकीय वातावरण बदलेल, अशा समजातून आम्हाला सोडून गेलेले अनेकजण आता पुन्हा आमच्या संपर्कात आहेत. काहीजण परतही आले आहेत. इस्लामपूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी आम्ही निश्चत केली आहे. आष्टा नगरपालिकेसाठीही पक्षाचा उमेदवार दोन-तीन दिवसात घोषित केला जाईल. लवकरच प्रभागनिहाय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सुकाणू समितीच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांची घोषणा केली जाईल.
आ. पाटील म्हणाले, पालिका निवडणुकीसाठी आघाडीतील घटक असलेले काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्ष सोबत आले तर त्यांनाही घेऊ. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आमचे धोरण आहे. त्यानुसार आमचे शहराध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करतील. राज्याप्रमाणे शहरातील मतदार यादीतही घोळ असल्याचे दिसून येत आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून हा घोळ केल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब गंभीर आहे. या प्रकाराच्या चौकशीची मागणी करणार आहोत.
यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील आदी उपस्थित होते.