Jayant Patil: सत्ताधाऱ्यांकडे नोटा छापण्याचा कारखाना आहे का?

आ. जयंत पाटील यांचा घणाघात : राष्ट्रवादीसह भाजपविरोधी सदस्यांनी आघाडीसोबत यावे
Jayant Patil
Jayant Patil: सत्ताधाऱ्यांकडे नोटा छापण्याचा कारखाना आहे का?Pudhari
Published on
Updated on

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. पाच वर्षे काम करूनही अनेक उमेदवार पराभूत झाले, मात्र ऐनवेळी आलेले पैशाच्या जोरावर निवडून आले. सत्ताधाऱ्यांकडे नोटा छापण्याचा कारखाना आहे का अशी शंका कधी कधी येते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस निवडणुकापासून दूर जात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार त्यांच्याहस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पाटील, माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, वैभव शिंदे, मनोज शिंदे बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, संचालक आनंदराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, खानापूर-आटपाडी व जत तालुक्यासह विविध ठिकाणी भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक उमेदवार न देण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यातील जनतेने भाजप विरोधात कौल दिलेला आहे. आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, जत, मिरज आणि शिराळा तालुक्यांत घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना निवडणूकपूर्व मदत करण्याचा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतला होता. भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश होता. आज त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.”

निवडणुकीत विशाल, विश्वजित यांनी चांगले काम केले : पाटील

ज्या ठिकाणी अपयश आले, तेथे आत्मपरीक्षण करू; परंतु जिथे विजय मिळाला, तेथे जनतेने दिलेल्या कौलाचा आदर राखत लोकाभिमुख कारभार करणे ही आपली प्राथमिकता हवी. सर्वसामान्यांची कामे करा. या निवडणुकीत खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी चांगले काम केले. मित्र पक्षांचेही संबंध चांगले ठेवा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांची सेवा करा, असे पाटील म्हणाले,

आमदार रोहित पाटील म्हणाले , “संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्ही जनतेच्या बळावर उभे राहिलो. सात जागांचा विजय हा संघटनेच्या एकजुटीचा परिणाम आहे.”

करेक्ट कार्यक्रमाचा आदर्श घेऊ : आ. रोहित पाटील

बैठकीमध्ये आमदार रोहित पाटील यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चांगले यश मिळाले आहे. यापुढेही आम्ही त्यांच्याबरोबर कायम असू. त्यांच्याबरोबर आबा बसायचे, त्यानंतर आई आमदार म्हणून बरोबर होती, आता गेल्या काही दिवसापासून मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांचे राजकारण मी जवळून पाहात आहे. करेक्ट कार्यक्रम करण्यात ते पटाईत आहेत. त्यांचा तो आदर्श आम्ही नक्कीच घेऊ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news