Rohit Patil : 'जलजीवन'च्या कामात हयगय चालणार नाही

आमदार रोहित पाटील यांनी खडसावले : कवठेमहांकाळ येथे आढावा बैठक; सुधारित आराखडे तयार करण्याचे निर्देश
Rohit Patil : 'जलजीवन'च्या कामात हयगय चालणार नाही
Published on
Updated on

मळणगाव : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समाविष्ट गावांचे सुधारित आराखडे तातडीने तयार करा. योजना ठेकेदारांच्या जीवावर सोडून देऊ नका. अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन कामे करावीत, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही. मला अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करायला लावू नका, अशा शब्दांत आ. रोहित पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभागृहात बुधवारी जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या आढावा बैठकीत रोहित पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, तालुक्यातील ३६ गावांचा या योजनेत समावेश आहे. त्यापैकी १० गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तीन गावांची कामे महावितरणच्या पातळीवर प्रलंबित आहेत. मात्र, इतर गावांतील कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वर्तन केल्याचे दिसून येत आहे. जलजीवन मिशनच्या कामांची अंदाजपत्रके वेळेवर वरिष्ठ कार्यालयात पोहोचत नाहीत. त्यामुळे कामे पुढे जाण्याऐवजी कागदोपत्रीच अडकून पडत असल्याचे दिसून येत आहे.

जलजीवन मिशनसारखी महत्त्वाची योजना केवळ कागदावर राबवून चालणार नाही. गावातील नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, प्रस्ताव तयार करणे, त्रुटी दूर करणे आणि वरिष्ठ कार्यालयात कागदपत्रे पाठविणे यासारख्या प्राथमिक बाबींमध्येच दिरंगाई होत असेल तर योजना पूर्ण कशी होणार? यामुळे अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे.

बैठकीला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, विकास हाक्के, पंचायत समिती सभापती सिंधुताई पाटील, उपसभापती वामन कदम, पंचायत समिती सदस्य रविकिरण घागरे, प्रियांका गेंड, वैशाली माने, संजय पाटील, अर्जुन गेंड, संदीप पाटील, आर. व्ही. माने, कार्यकारी अभियंता सोनाली पाटील उपस्थित होते.

प्रस्तावाची माहिती नाही, त्रुटी काय दूर करणार

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अण्णासाहेब पाटील यांनी तालुक्यातील योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मात्र, यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी उपअभियंता मनोज चांदोरे व अण्णासाहेब पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यासाठी नेमके कोणते आक्षेप आहेत, याचीच अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचे बैठकीत समोर आले. प्रस्तावातील त्रुटींची माहितीच अधिकाऱ्यांना नसेल, तर त्या दूर करून योजना मार्गी कशी लावणार? असा थेट जाब उपस्थितांनी विचारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news