

Ishwarpur Nagar Parishad Election Result
सांगली : सांगली जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने विरोधकांचा धुव्वा उडवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले असून भाजपचे विश्वनाथ डांगे पराभूत झाले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या आठ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज (दि.२१) मतमोजणी पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता उमेदवारांचे भवितव्य मशिनमधून बाहेर येत आहे.
ईश्वरपूर नगरपरिषदेच्या एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने तब्बल २२ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, भाजप महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांना केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये भाजपला तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन व शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. पालिकेत सत्तांतर झाले असून पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेन येथे सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा सुमारे ७ हजार मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पद मिळवले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील विकास आघाडीचे अध्यक्ष व भाजपचे नेते विक्रम पाटील, उपाध्यक्ष वैभव पवार, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, या नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर प्रमुख विजयी उमेदवारांच्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी नगराध्यक्ष प्रा. अरुणादेवी पाटील, सुभाष माजी, नगरसेवक खंडेराव जाधव, शुभांगी शेळके आदींचा समावेश आहे. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्लोष केला.