

सांगली : संग्रामसिंह पाटील : सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत व शहरांमध्ये रेशन धान्य दुकानांमधून किडके धान्य वाटप होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रेशन दुकानात किडे पडलेले, अळ्या झालेले, बुरशी लागलेले, बारीक दगड, मातीमिश्रित धान्य वाटप होत असल्याचे समोर आले आहे. धान्य निकृष्ट दर्जाचे असून जनावरांनाही खायला देणे धोक्याचे आहे.
कोरोना काळात वाळवा तालुक्यातील काही रेशन धान्य दुकानांतून निकृष्ट प्रकारचे धान्य वाटप होत असे. हे धान्य न घेणार्या लाभार्थ्यांबरोबर दुकानदार वाद घालत असत. लॉकडाऊन असल्याने मिळेल ते धान्य स्वीकारणे एवढेच सर्वसामान्यांच्या हाती होते. त्यामुळे वाद करणे सोडून, मिळेल ते धान्य लाभार्थी स्वीकारत असे.
आता मात्र दुकानदारांकडून माणसाला खाण्यायोग्य धान्य देण्याऐवजी जनावरेही खाणार नाहीत, असे धान्य वाटप होऊ लागल्याने अनेकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रेशन धान्य दुकानात किडे पडलेले, अळ्या झालेले, बुरशी लागलेले, बारीक दगड, माती मिश्रित धान्य वाटप होत आहे. दुकानातील धान्यांची अनेक पोती किड्यांनी भरलेली आहेत.
याबाबत संबधित दुकानदारांना विचारणा केल्यास 'आमच्या घरात पिकते का, न्यायचे असेल तर न्या नाहीतर जा', अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. या विषयाबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेऊन लोकांना चांगले धान्यपुरवठा करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.
तपासणीसाठी पथक पाठवू : सवदे
वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानात किडे लागलेले व मातीमिश्रित धान्य वाटप होत आहे. याप्रकरणी तालुका पुरवठा अधिकारी बाळासाहेब सवदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित धान्य तपासणीसाठी पथक पाठवून देणार आहे. निकृष्ट धान्य वाटप करू नका, अशा सूचना दुकानदारांना दिल्या आहेत.