

इस्लामपूर : सुनील माने : शेअर मार्केट, ऑनलाईन ट्रेडिंगसह वेगवेगळ्या फसव्या गुंतवणूक योजनांनी आजकाल इस्लामपूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 'घरबसल्या झटपट पैसा मिळवा आणि श्रीमंत व्हा', असे स्वप्न दाखवत सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या खिशातला घामाचा पैसा काढून घेत त्यांना 'गंडा' घालणार्या अनेक कंपन्या आजमितीस बाजारात आल्या आहेत. ( sangli fraud )
शेअर मार्केटच्या परताव्याच्या बहाण्याने इस्लामपुरातील 40 ते 50 लोकांना पुणे येथील दाम्पत्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्यानंतर हा भूलभुलय्या अधिक ठळकपणे पुढे आला आहे. या 'स्कीम-स्कॅम'मध्ये अडकून आज अनेकजण कंगाल झाले आहेत. परंतु त्यातून धडा घेऊन 'शहाणे' होण्याची वृत्ती मध्यमवर्गाकडे नसल्याने मार्केटिंगचे नवनवे 'फंडे' समोर ठेवत लोकांना गंडे घालण्याचा फंडा जोमात आहे.
'घरबसल्या महिना 35 हजार रुपये कमवा…, पार्ट टाईम जॉब करून हजारो रुपये कमवा. सर्व्हे करा आणि लखपती बना. 4 टक्के व्याजदराने कर्ज घ्या. त्यासाठी आधी फी म्हणून एवढी रक्कम गुंतवा', अशा अनेक योजनांच्या जाहिराती आज सर्वांनाच भुरळ पाडतात.
लोक योजनांमध्ये पैसे गुंतवितात आणि फसतात, अशी अनेक उदाहरणे ताजी आहेत. वाळवा तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही या बोगस योजनांचा सुळसुळाट झाला आहे.
2002 मध्ये एका कंपनीने मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांच्या खिशातील कष्टाचा पैसा अलगद काढून घेतला आणि एके दिवशी या कंपनीला 'टाळे' लावून संचालकांनी पोबारा केला होता. 2011 मध्येही अनेक चेन मार्केटिंग, मल्टी मार्केटिंग, चिटींग चेन मार्केटिंग अशा अनेक कंपन्यांच्या एजंटांनी लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांची डोळ्यादेखत फसवणूक केली होती. ( sangli fraud )
लोकांना झटपट पैसा हवा असतो. काही करून लवकरात लवकर पैसे कमवायचा अनेकांचा हव्यास असतो. म्हणून बँक, पोस्ट अशा सुरक्षित ठिकाणी कमी व्याज दरात पण सुरक्षित पैसा ठेवण्याआधी ते खासगी फायनान्स, शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करण्याआधी ग्राहक त्या कंपनीची माहिती घेत नाहीत. दामदुप्पट, आकर्षक व्याजाच्या आमिषाला बळी पडत आहेत.
आर्थिक अडचणीत असलेले तरुण, महिला या कंपन्यांतील लोकांच्या बोलण्याला फसत आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना ग्राहकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.