

सांगली : ऐन निवडणूक काळात मध्यप्रदेशमधून पिस्तूल आणून त्याची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेड्या ठोकल्या. तिघांकडून 4 लाख 21 हजार 500 रुपये किंमतीचे सहा पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हद्दपार गुन्हेगार किरण शंकर लोखंडे (वय 24, रा. वाघमोडेनगर, सांगली), अभिजित अरुण राणे (वय 32, रा. शारदानगर, सांगली) आणि तुषार नागेश माने (वय 30, रा. हाडको कॉलनी, सांगली) यांचा समावेश आहे. तर पाजी (रा. उमराटी, ता. बलवाडी, मध्यप्रदेश) हा पसार आहे.
शहरात शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तपासावर होते. यादरम्यान महापालिका निवडणुकीच्या काळात एका हद्दपार गुन्हेगाराकडून पिस्तुलांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील संकेत कानडे, पवन सदामते, अभिजित माळकर आणि सूरज थोरात यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक तपास करीत होते.
दरम्यान, दि. 3 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हद्दपार गुन्हेगार किरण लोखंडे याच्यासह अभिजित राणे आणि तुषार माने हे तिघे अकुजनगर ते वारणाली रस्त्यावर थांबले असून त्यांच्याडे सहा पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला. पोलिसांना पाहताच तिघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघांना पाठलाग करून पकडण्यात आले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सहा पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मध्यप्रदेशमधील पाजी नामक व्यक्तीकडून तस्करी करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 4 लाख 21 हजार 500 रुपये किंमतीचे सहा पिस्तूल जप्त करण्यात आले. पुढील तपास संजयनगर पोलिस करीत आहेत. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील पिस्तूल तस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.