डॉ. सुरेश खाडे यांना जबरदस्त आव्हान शक्य

डॉ. सुरेश खाडे यांना जबरदस्त आव्हान शक्य
Published on
Updated on

मिरज, जालिंदर हुलवान : सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), सेना (ठाकरे गट) एकत्र आल्यास भाजपचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासमोर जबरदस्त आव्हान उभे राहू शकते. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला काही प्रमाणात तोटा होणार आहे. परिणामी भाजपला जोरदार तयारी करावी लागेल.

एकेकाळी मिरज हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. याची सुरुवात 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली. तेव्हापासून आजतागायत हा मतदार संघ भाजपच्याच ताब्यात राहिला आहे. 2009 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना भाजपचे सुरेश खाडे निवडून आले होते.2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत खासदार संजय पाटील भाजपचे खासदार झाले. त्यावेळी मतदारांनी भाजपला साथ दिली.

संजय पाटील यांना 49 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघाने पुन्हा संजय पाटील यांना मताधिक्य दिले. त्यावेळी काँग्रेस आघाडीचे (स्वाभिमानी पक्ष) उमेदवार विशाल पाटील यांच्यापेक्षा 17 हजार 494 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा 52 हजार 530 अधिक मते मिळाली होती. आता पडळकर भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. वंचितची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे त्यांच्या मतांविषयी अंदाज बांधणे कठीण आहे.

शिवसेनेत उभी फूट पडली आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची साथ ही भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळाली होती. आता शिवसेना फुटून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट निर्माण झालेत. मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद भाजप विरोधी काम करेल. राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे, मात्र मिरज शहर आणि ग्रामीण भागामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी मजबूत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शक्तीशाली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट हा भाजप विरोधी काम करेल.

यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हा भाजप उमेदवाराच्या विरोधात इतका सक्रिय नव्हता आता मात्र तो सक्रिय राहील. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचा जयंत पाटील गट भाजपच्या विरोधात जोरात काम करेल. त्याच्याशी निकराचा सामना करण्यासाठी भाजपला झुंजावे लागेल. त्यासाठी जोरदार तयारीच लागेल.

2019 च्या निवडणुकीपूर्वी मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापतीपद निवडीवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. खासदार संजय पाटील व मंत्री सुरेश खाडे यांच्यातील संघर्ष पुढे आला होता. त्यामुळे खाडे यांचे कार्यकर्ते पाटील यांचे काम करण्यास इच्छुक नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे वाद मिटला होता. संजय पाटील भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार गृहीत धरले तर आता सुरेश खाडे पालकमंत्री असल्याने त्यांना ताकदीने काम करावे लागेल. याचे कारण भाजपपुढे बदलत्या राजकीय स्थितीने आव्हान निर्माण केलेले आहे, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news