वस्तू हरवली आहे, भिलवडीत जा… नक्कीच सापडेल; प्रामाणिक भिलवडीकरांचे होतेय कौतुक

वस्तू हरवली आहे, भिलवडीत जा… नक्कीच सापडेल; प्रामाणिक भिलवडीकरांचे होतेय कौतुक

[author title="प्रदीप माने" image="http://"][/author]

भिलवडी : राष्ट्रगीताने व्यवसायाची सुरुवात होणारे, सापडलेल्या वस्तू परत करणारे आणि विविध बाजूंनी सांस्कृतिक ठेवा जतन करणारे, असे गाव म्हणून भिलवडीची नवीन ओळख बनली आहे. आजअखेर 78 अँड्रॉईड मोबाइल, 6 वाहने, सुमारे 92 हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम, आधारकार्ड, पॅनकार्ड, जेवणाचे डबे, किल्ल्या, अगदी खिळे-मोळे सुद्धा भिलवडीकरांनी आणून दिलेले आहेत.

क्रीडाशिक्षक डी. के. किणीकर यांना वसगडेमध्ये दोन मोबाईल सापडलेे होते. आष्टा लायनर्समध्ये काम करणारे हणमंत पाटील यांना औदुंबर फाट्यावर एक मोबाईल सापडलेला होता आणि दिलीप मोरे यांना तासगावमध्ये एक महागडा मोबाईल सापडलेला होता. असे सगळे मोबाईल भिलवडीकरांनी त्या त्या व्यक्तीला प्रामाणिकपणे परत दिलेले आहेत.

येथील गणी मुल्ला यांना 21 हजार रुपये रोख असलेली पिशवी रस्त्यात सापडलेली होती. व्यापारी प्रवीण साळुंखे यांना पाच हजार रुपये असलेली पर्स सापडलेली होती. तसेच शेतात कामाला जाणारा अमरीश बिराजदार, चहाविक्रेते विष्णू बावधनकर, श्रीकांत पास्ते, विजय शिंदे, फैयाज तापेकरी, सुकुमार भोईटे, पवन चौधरी, अनिकेत यादव, सुनील माने, साहिल वायदंडे, रमेश भोसले, आकाश शेटे, स्मिता शेटे, माया खरात आदींनीही त्यांना सापडलेल्या वस्तू, पैसे, मोबाईल प्रामाणिकपणे परत दिलेले आहेत.

मुंबईच्या चंद्रकांत चौगुले यांचा मोबाईल हरवला होता. आष्ट्यामध्ये एका पेट्रोल पंपावर सांगण्यात आले की, तुम्ही भिलवडीत जा, त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल निश्चितच मिळेल आणि योगायोगानं त्यांचा मोबाईल प्रवासी वाहतूक करणार्‍या अंकुश माने यांना सापडलेला होता. पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिमवरून सांगितल्यानंतर अंकुश माने यांनी अगदी ताबडतोब आणि प्रामाणिकपणे त्यांचा मोबाईल परत केला.
पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पर्स, आधारकार्ड, खुरपे, कासरा, टोपी, रेशनकार्ड, सायकल, मसाला पाकीट, एटीएम कार्ड, अंगठी, घड्याळ, जेवणाचे डबे अशा वस्तूही प्रामाणिकपणे ज्याच्या त्याला परत दिल्या आहेत.

विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात

राष्ट्रगीताने सुरुवात व्हावी म्हणून सुरू केलेल्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिमचा उपयोग आज रक्तदान, गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, दिनविशेष, मान्यवरांचे वाढदिवस अशी माहिती येथून देण्यात येत आहे. सुसंस्कृत असलेल्या या गावामध्ये विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून येथे विविध सण साजरे केले जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news