

इस्लामपूर : इस्लामपूरसह तालुक्यात रविवारी पाऊस झाला. सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने इस्लामपूर- पेठ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. येथील रिंगरोड परिसरात पावसाचे पाणी घरांत शिरले.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्मा वाढला होता. तालुक्यात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. सकाळी बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला. सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. इस्लामपूरसह बोरगाव, नेर्ले, कापूसखेड, बहे आदी ठिकाणी पाऊस पडला. इस्लामपुरात सुमारे तासभर पडलेल्या पावसाने गटारी तुंबल्या. शनि मंदिर परिसर, अंबिका उद्यान, निनाईनगर, तहसील चौक, कापूसखेड नाका आदी परिसरात रस्त्यांवरून गटारीचे पाणी वाहत होते. इस्लामपूर-पेठदरम्यान रस्त्याचे, गटारीचे काम सुरू आहे. रस्ता खोदला आहे, दोन्ही बाजूला चरी आहेत. शनिवारी, रविवारी झालेल्या पावसाने रस्त्यात पाणी साचले. रस्त्यावरून वाहने घसरू लागल्याने चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका परिसरात पावसाचे पाणी घरांत शिरले.
शिराळा शहर : शिराळा व परिसरात रविवारी (दि. 18) सायंकाळी पाच ते साडेपाचपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत उष्मा होता. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची मोठी धावाधाव झाली. विक्रीसाठी आणलेल्या आंब्यांची काळजी घेताना व्यापार्यांची धावपळ सुरू होती. त्यांचेही थोड्या प्रमाणात नुकसान झाले. शिराळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत होते. वाकुर्डे, इंग्रुळ, रेड, खेड, बेलदारवाडी, एमआयडीसी परिसर, बिऊर, उपवळे, तडवळे, कापरी, बिऊर, जांभळेवाडी परिसरात हा पाऊस झाला. रविवारी वीजपुरवठा दिवसभर खंडित होता. महावितरणच्या कर्मचार्यांना, कुठे फॉल्ट आहे हेच सापडत नव्हते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. वीज सारखी जा-ये करत असल्याने घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत वीज गायब होती.