

सांगली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून 2023 मध्ये 92 कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला आहे. जून 2022 च्या तुलनेत 2 कोटी रुपयांची घट झाली आहे. एप्रिल व मे महिन्यात चांगला महसूल होता. एप्रिल ते जून या तिमाहीचा महसूल 328 कोटी रुपये आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीपेक्षा 15 कोटी रुपये महसूल जास्त आहे.
जून 2022 मध्ये जीएसटीचे संकलन 94 कोटी रुपये होते. जून 2023 चा महसूल 92 कोटी रुपये आहे. महसुलात 2 कोटी रुपयांची घट झाली आहे. मात्र आर्थिक वर्ष एप्रिल ते 2 मध्ये जीएसटीचे संकलन 313 कोटी रुपये होते. एप्रिल ते जून 2023 चा महसूल 328 कोटी रुपये आहे. तिमाहीत महसूल 15 कोटींनी अधिक आहे.
देशात जीएसटी संकलनाने सलग पंधराव्यांदा 1.40 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशाचा विचार करताना जून 2023 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 1 लाख 61 हजार 497 कोटी आहे. जून 2022 मध्ये 1 लाख 44 हजार 616 कोटी महसुलाच्या तुलनेत 11.67 टक्के जादा संकलन झाले आहे. महाराष्ट्राचा विचार करता जून 2023 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 26 हजार 98 कोटी आहे. जून 2022 मध्ये 22 हजार 341 कोटी महसूल झाला आहे.
देश, राज्याच्या तुलनेत सांगलीच्या महसुलात घट
अर्थव्यवस्था मजबूतीसह करचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणार्यांवर कारवाई या गोष्टी जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. जिल्ह्यात बोगस नोंदणी करणार्या विरुद्ध शोध मोहीम सुरू आहे. केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवायांमुळे जीएसटी महसूल संकलन नियमित आहे. जूनमध्ये देश व राज्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्याच्या महसुलात घट झाली आहे.