Gopichand Padalkar| तीन तारखेनंतर सहकारातील 'हिशेब मांडणार’

गोपीचंद पडळकर; कारखाने खरेदी, सूतगिरण्यांच्या लिलावावरून आमदार जयंत पाटील लक्ष्य
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

जत : साखर कारखाने खरेदी करायचे आणि सूतगिरण्या लिलावात काढायच्या, यालाच सहकार वाचवणे म्हणायचे का? असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. तीन तारखेनंतर सहकारातील सर्व घडामोडींचा हिशेब मांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्हा बँकेच्या मतदानादरम्यान रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आमदार जयंत पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, मार्केट समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा पुढे करण्यात आला. मात्र, जत, तासगाव आणि मिरज पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात निवडणूक लादली, तर दुसरीकडे नातलगांना बिनविरोध निवडून आणले. दुष्काळाचा निकष निवडणुकीत सर्वांसाठी समान का लावला गेला नाही? जिल्हा बँकेत आपण गेल्यास सहकार मोडीत निघेल, असा प्रचार केला जात असल्याचे सांगत पडळकर म्हणाले, कारखाने विकत घेणे आणि सूतगिरण्या लिलावात काढणे, या कृतीतून कोणता सहकार वाचवला, याचे उत्तर त्यांनी द्यावे. जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहार बाहेर येण्याच्या भीतीतूनच मला विरोध होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनचा मुद्दा चर्चेत

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होेते. या प्रक्रियेतील घडामोडींची आपल्याला माहिती असल्याचे सांगत कोल्हापूर विमानतळावरील एका प्रसंगाचा त्यांनी सूचक उल्लेख केला. मात्र, त्याविषयी अधिक बोलणे टाळले. तीन तारखेनंतरच सर्व बाबी स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले.