

Gopichand Padalkar on Uddhav Thackeray
विटा : राजकारणात एक चुकीचा निर्णय घेतला की त्याचे परिणाम दूरगामी आणि गंभीर ठरतात, असे सांगत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाष्य केले. “उद्धवसाहेबांबद्दल भाजपलाही आस्था आहे. शेवटी ते बाळासाहेबांचे घर आहे,” असेही ते म्हणाले .
खानापूर तालुक्यातील करंजे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विटा येथील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील प्रमुख उपस्थित होते. विटा नगरपालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. “आठवडाभर काम केल्यानंतर शनिवार-रविवार सुट्टी लागते, तसाच हा राजकारणातला बदल आहे. पाच वर्षांचा ब्रेक घ्या, पुन्हा जोमाने काम करा आणि पुढच्या वेळी धक्का द्या,” असे ते म्हणाले.
यावेळी उदाहरण देताना आमदार पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयांवर टीका केली. “मुंबई महानगरपालिका आमचीच आहे, असे ठाकरे म्हणायचे. मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने सगळे गणित बिघडले. कोणाचे ऐकून हा निर्णय घेतला, याचा परिणाम आज त्यांना भोगावा लागत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेचे बजेट गोवा राज्याच्या बजेटएवढे असल्याचे नमूद करत त्यांनी, “आज तिथे भाजपचा झेंडा फडकतो आहे,” असेही सांगितले.
मागील निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले असतानाही भाजपने उपमहापौरपद घेतले नाही, याचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिलदारपणा’चा दाखला दिला. “त्या काळात मातोश्रीवर देशातील आणि केंद्रातील सर्व नेत्यांची वर्दळ असायची. आज परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे कुठेही, कोणालाही भेटताना दिसतात,” असे म्हणत त्यांनी राजकीय स्थित्यंतरावर भाष्य केले.
पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, “जर मुंबईत अशी अवस्था असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नगरसेवक किती निवडून आले, याचा विचार करावा लागेल. राजकारण बदलले आहे. सांगली, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.”
कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, “आता जिल्ह्यात आणि राज्यात सकारात्मक संदेश द्यायचा असेल, तर भाजपला अधिक बळ द्या. नगरपालिकेत संधी हुकली असली तरी जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा रोवायचा आहे.” शेवटी त्यांनी, “भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांवरही विरोधक एक रुपयाचा आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत,” असे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.