

सांगली : सोनं... महिलांचा अतिशय प्रिय, जिव्हाळ्याचा विषय... गेल्या वर्षभरात दराचा उच्चांक नोंदविणारं सोनं दिवाळीनंतर स्वस्त होऊ लागलंय.. तरीही महिला वर्ग अस्वस्थ आहे. दर आणखी वाढणार म्हणून चढ्या दरानं डाग, दागिना करून घेतला खरा... पण आता दर घसरलेला पाहून त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे... आपण फसलो तर नाही नां! चांदीपेक्षाही सोन्याच्या दागिन्यांना महिलांची पसंती अधिक असते... त्यामुळेच दरातील घसरणीने त्यांची धडधड वाढली आहे.
'अजून दर कमी होतील' या भीतीपोटी महिलांनी सोने खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे. त्यातच दर १ लाख रुपयांच्या खाली येतील, अशा चर्चेमुळे अनेक महिला खरेदी पुढे ढकलत आहेत. आज सोने खरेदी केले आणि उद्या भाव अजून पडले, तर तोटा होईल, या भीतीमुळे आणि संभ्रमामुळे महिलांना मनमोकळेपणाने खरेदी करता येत नाहीये. पुरुष शेअर बाजाराबाबत जितके उत्सुक, तितक्याच महिला सोन्याच्या दराबाबत उत्सुक असतात.
महिला सोन्याचे दागिने केवळ हौसेसाठी नाही, तर संकटकाळातील सुरक्षित गुंतवणूक, स्त्रीधन म्हणून साठवतात. त्यामुळं आपल्याकडील सोनं आणि सध्याचा दर, याची गोळाबेरीज करून किती फायदा आणि किती तोटा झाला, याची समीकरणं करण्यात त्या गुंतल्या आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होते. त्यामुळे सोने दराची घसरण एकादृष्टीने लाभदायक आहे. मात्र दसरा-दिवाळीवेळी जी सोने खरेदी झाली, ती उच्चांकी दराने होती. आता दर घसरल्याने महिलांना त्यांच्या गुंतवणुकीचे मोल कमी झाल्याची चिंता सतावत आहे.
सोने-चांदी दराच्या घसरणीची कारणे...
मजबूत अमेरिकन डॉलर...
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे.
व्याजदर वाढीची शक्यता...
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर वाढवेल, या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातून नफा वसुली (विक्री) सुरू केली आहे.
रुपयाची मजबुती...
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत काहीसा सावरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे आयात दर कमी झाले आहेत.
सोनं ३० टक्क्यांनी स्वस्त
३१ डिसेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ३३ हजार रुपये होता, जो २९ जानेवारी रोजी १ लाख ७६ हजार रुपयांच्या उच्चांकावर गेला होता. या उच्चांकी स्तरापासून आतापर्यंत सोने तब्बल ५२ हजार २२८ रुपयांनी म्हणजेच सुमारे ३० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
चांदी ६० टक्क्यांनी स्वस्त
चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा दर २ लाख ३० हजार रुपये होता आणि २९ जानेवारीरोजी त्याने ३ लाख ८० हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. तिथून आतापर्यंत चांदी सुमारे २ लाख २७ हजार रुपयांनी म्हणजेच जवळपास ६० टक्क्यांनी घसरली आहे.