सांगली : दिवंगत आमदार बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजूर

सांगली : दिवंगत आमदार बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजूर

विटा; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी आणि घोटी खुर्द या दोन्ही गावातील ओढापात्रालगत पूर संरक्षक भिंतीसाठी २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या दोन्ही कामांसाठी आमदार अनिल बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केला होता. याबद्दल या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सुहास बाबर यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाले. आमदार बाबर यांनी निधनापूर्वी पाठपुरावा केलेल्या आटपाडी व घोटी या गावातील कामांना आता मंजुरी मिळाली आहे. आटपाडी येथील मुख्य बाजारपेठेलगत शुक्र ओढ्याचे पात्र आहे. पावसाळ्यात ओढ्यातील पाणी पात्राबाहेर येऊन बाजारपेठेतील दुकांनामध्ये हे पाणी शिरते. यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे या ओढ्याच्या पात्रालागत पुरसंरक्षक भिंत बांधण्यात यावी, यासाठी आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील आणि स्थानिक लोकांनी तसेच तेथील आसपासच्या व्यापाऱ्यांनी आमदार बाबर यांच्याकडे मागणी केली होती.

ही बाब लक्षात घेऊन आमदार बाबर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये या ओढ्यालगत पुरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी निधीची मागणी केली होती. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री सुरेश खाडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन याठिकाणी पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याबाबत विनंती केली होती. याची दखल घेऊन याकामी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील घोटीखुर्द येथील जोतिबा मंदिरालगत ओढापात्र आहे. दर पावसाळ्यात ओढ्याचे पाणी मंदिरापर्यंत येते. येथील ओढयालगत संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी तेथील गावकऱ्यांनी केली होती. आमदार बाबर यांनी या कामासाठीही पाठपुरावा केला होता. यासाठीही २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

महाराष्ट्रातील एक अत्यंत कार्यतत्पर आमदार म्हणून ओळख असणाऱ्या अनिल बाबर यांनी त्यांच्या अखेरपर्यंत जनतेच्या कामासाठी आयुष्य वेचले. त्याचीच परिणीती म्हणून हा निधी मिळाला असल्याची या दोन्ही गावातील लोकांची भावना आहे. त्यांनी ही भावना आज बुधवारी आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांची भेट घेऊन व्यक्त केली. तसेच कृतज्ञता व्यक्त केली. यावर सुहास बाबर यांनी भविष्यात आमदार अनिल बाबर यांच्याप्रमाणेच आपण सर्व जनतेच्या पाठीशी खंबीर राहण्याचे आश्वासन दिले. तसेच जनतेसाठी अहोरात्र कष्ट करणे, ही आमदार अनिल बाबर यांची आपणाला शिकवण आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसारच यापुढे वाटचाल करू, असे आश्वासन सुहास बाबर यांनी यावेळी दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news