

Vaibhav Patil NCP to BJP
विटा : खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील मंगळवारी (दि. १०) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते वैभव पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच पक्ष आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सतत डावलले जात असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी विट्यातील आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
यात वैभव पाटील यांना पाटील गटाच्या भावी वाटचालीबद्दल निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्याचे ठरले. त्यानुसार वैभव पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही आमदार पडळकर यांनी सांगितले.