

मिरज : सांगली जिल्ह्यात थ्री स्टार दर्जाचे शासकीय वसतिगृह बांधून देऊ, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी मिरजेत केले.सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ. डॉ. सुरेश खाडे उपस्थित होते.
ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून, राज्यातील 125 वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात 125 वसतिगृहे उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, यादृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडेतत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील. विद्यार्थीदशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देन आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टारप्रमाणे सोयी-सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.
आमदार सुरेश खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्यायमंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. मिरजेतील हे वसतिगृह उत्तम दर्जाचे बांधले आहे. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात 17 बौद्ध विहार बांधली. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खासगी जागेत असून, ती शासकीय जागेत असावीत, यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुरेश वारे, उपायुक्त वंदना कोचुरे, कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहायक आयुक्त मेघराज भाते, मिरजेचे माजी सभापती सुरेश आवटी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.