

विजय लाळे
विटा : साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने मज्जाव केल्याच्या निर्णयाचा फटका पहिल्या २४ तासांतच पोल्ट्री उद्योगाला बसला. साखरेची आयात टाळण्यासाठी घेतलेल्या धोरणामुळे आता मका आयात करण्याची वेळ आली.
देशांतर्गत बाजारात साखरेच्या किरकोळ किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि साखरेच्या संभाव्य तुटवड्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार येत्या इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी उसाचा रस, थेट साखर, शुगर सिरप आणि बी हेवी मळीपासूनच्या इथेनॉल निर्मितीवर संपूर्ण बंदी घातली. मात्र या निर्णया चा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ला बसणारच आहे, मात्र हा निर्णय जाहीर झाल्याच्या पहिल्या २४ तासांतच राज्यातील पोल्ट्री उद्योगाला मोठा तडाखा बसला.
आधीच महाराष्ट्रातला लेयर पोल्ट्री उद्योग अर्थात अंडी उत्पादन व्यवसाय सध्या एका अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. साखर कारखान्यांना इथनॉल बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता आपोआपच पर्यायी घटकांपासून म्हणजे मका, ज्वारीसह अन्नधान्यांपासून मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती होईल. इथेनॉल संदर्भा चे हे नवे धोरण जाहीर होताच धान्यांची साठेमारी सुरू झाली. याचा परिणाम म्हणून महा राष्ट्रातील पोल्ट्री खाद्यासाठी आवश्यक असणाऱ्या मक्याचा दर गेल्या दोन दिवसांत थेट क्विंटल मागे ६०० ते ७०० रुपयांनी वाढला आहे.
यामुळे डिस्टिलरी आणि पोल्ट्री फीड मिल यांसाठी मका मिळणे मुश्किल होणार आहे. गेल्या आठवड्यात साधारण बावीसशे ते तेविसशे रुपये प्रति क्विंटल मिळणारा मका आता ३ हजार ते बत्तीसशे रुपयांवर गेला आहे. कमर्शियल लेयर फीडमध्ये म्हणजे अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी मका आणि तांदळाचा वाटा ६० ते ६५ टक्के असल्याने थेट पोल्ट्री खाद्याचा मूलभूत खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
एकीकडे दुष्काळाची स्थिती आणि एल निनोचा धोका यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. शिवाय कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या प्रमुख खरीप मका उत्पादक राज्यां मध्येही पाऊस कमी किंवा न झाल्यास मक्याचे दर आणखी वाढू शकतात. शिवाय एल निनो मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे मक्याच्या उत्पादन घटले आणि पक्ष्यांमध्ये 'हीट स्ट्रेस' वाढून फीड कन्वर्जन रेशो (खाद्य रूपांतरण प्रमाण) बिघडला आहे. परिणामी, अंडी उत्पादनाची कार्यक्षमता ५ ते १० टक्क्यांनी कमी झाली आणि पक्षांचा मृत्यूदर वाढला शिवाय अंड्यांचा आकारही लहान होत आहे.
ब्रॉयलर उद्योगाच्या तुलनेत लेयर उद्योगात पक्ष्यांचे उत्पादन अचानक थांबवणे शक्य नसते, कारण लेयर पक्षी दररोज अंडी देतात. श्रावण, नवरात्री किंवा दिवाळीनंतरच्या काळात अचानक मागणी कमी झाली आहे त्यातच आता मक्याचे दर अचानक वाढल्याने पोल्ट्री उद्योग संकटात आला आहे.
याबाबत खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील २० हजार पक्षी असलेले पोल्ट्री धारक धनाजी देवकर आणि ६० हजार पक्षी असलेले विट्यातले पोल्ट्री धारक रणजीत शिंदे म्हणाले, सध्या मका दर ३० ते३२ रुपये किलो झाला आहे, सोयचा दर किलोमागे ६५ ते ७० रुपये, डी ओ आर बी (तांदळाचा भुसा) किलोमागे २६ ते २८ वर पोहोचला आहे. तर एका अंड्याचा निर्मिती खर्च ५ रुपये ८० पैसे ते ६ रुपये इतका आहे. आज शेतकऱ्याला एका अंड्यामागे ५ ते ५ रूपये २५ पैसे मिळतात. म्हणजे आज रोजी आम्ही एका अंड्या मागे एक रुपया ७५ पैसे नुकसान सोसत आहोत. एक हजार कोंबड्यां ची ९० टक्के जरी प्रोडक्शन पकडलं तर ९ हजार अंडयांमागे रोजचे ७ हजार ते ९ हजार इतकं नुकसान होत आहे.
सरकारने जर साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची बंदी अशीच ठेवणार असतील तर पर्याय म्हणून मका आयात केला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातला पोल्ट्री उद्योग मोडून पडण्याची साधार भीती निर्माण झाली आहे.