

इस्लामपूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचा फटका अनेक व्यावसायिकांना बसणार आहे. महामार्गावरील उड्डाण पूल, रस्त्याकडेच्या पक्क्या गटारी, सेवारस्ते यामुळे अनेक लहान-मोठी हॉटेल्स् व अन्य व्यवसायांवर संक्रांत आली आहे. काही व्यवसाय स्थलांतरित झाले आहेत, तर काही जागेअभावी बंद पडले आहेत. यामुळे अनेक व्यावसायिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
दोन वर्षापूर्वी महामार्गाच्या सातारा ते कागलदरम्यानच्या 133 किलोमीटर लांब रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले. यापूर्वी हा महामार्ग चारपदरी होता. आता तो सहापदरी करण्यात येत आहे. यासाठी 3 हजार 255 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वाळवा तालुक्याच्या कासेगाव ते कणेगाव या 35 किलोमीटर अंतरात येवलेवाडी फाटा, केदारवाडी, नेर्ले, वाघवाडी फाटा, येलूर असे नवीन 5 उड्डाण पूल उभारण्यात येत आहेत. महामार्गावरील ओढे - नाल्यांवर लहान-मोठे पूल बांधण्यात येत आहेत. महामार्गावर कासेगाव ते कणेगाव या वाळवा तालुक्याच्या हद्दीत शेकडो लहान-मोठी हॉटेल्स, हातगाडीवाले, पान टपर्या, गॅरेज व अन्य व्यवसाय उभे राहिले आहेत.