

विजय लाळे
विटा : ‘माझ्या आईला मी न्याय मिळवून देणारच...’ हा निग्रह उराशी बाळगून पाच वर्षांपासून लढा देणाऱ्या शाळकरी मुलीचे डोळे, हा निकाल ऐकताच पाणावले. विटा न्यायालयाने तिच्या बापाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, न्यायासाठी लढा देणाऱ्या पोलिसांना पाहून या चिमुकलीचा बांध फुटला आणि तिने पोलिस निरीक्षकांना घट्ट मिठी मारली.
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायालयाने आरोपी रामचंद्र ऊर्फ संतोष कदम याला फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी ती आजोबा आणि मामासोबत न्यायालयात आली होती. न्यायालयाच्या आवारातून पोलिस ठाण्यात आल्यानंतरही तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. गेल्या काही काळापासून तिला भावनिकदृष्ट्या भक्कम करणाऱ्या महिला पोलिस नीलम जगदाळे आणि भाग्यश्री नांगरे तिच्यासोबत होत्या.
पोलिस ठाण्यात येताच ही मुलगी थेट पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्याकडे झेपावली आणि तिने त्यांना मिठी मारली. या भावूक प्रसंगाने पोलिस फडतरे यांच्याही डोळ्यांत पाणी आले. त्यांनी तिची समजूत काढत डोक्यावरून हात फिरवून, "काळजी करू नको बाळा, स्वतःला सांभाळ. तू खूप मोठी हो आणि खूप मोठी ऑफिसर बन," असा धीर दिला.
प्रत्यक्षदर्शी साक्ष निर्णायक...
७ जून २०२१ रोजी घडलेली ती भयानक रात्र या चिमुकलीच्या अजूनही डोळ्यांसमोर आहे. दारूच्या व्यसनापोटी बाप आईकडे रोज पैशांची मागणी करायचा आणि मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही सकाळी मारहाण झाल्यावर आई तिला घेऊन मजुरीच्या कामावर गेली होती. रात्री दोघी झोपल्या असताना, दारूच्या नशेत बापाने आईवर पेट्रोल ओतून काडी लावली. आई आगीच्या ज्वाळांमध्ये ओरडत बाहेर पळू लागली, तेव्हा क्रूर बापाने तिला मागून लाथ मारून खाली पाडले आणि गळ्यावर चाकूने वार केले होते.