

Pune Graduate Constituency Election
विटा : पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या २३ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांनी आमदार सुहास बाबर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. प्रारंभी विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जीवनप्रबोधिनी शैक्षणिक संकुलच्या सोनिया बाबर, भाजप प्रदेश सचिव शरद लाड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, युवा नेते प्रकाश बागल, दिलीप किर्दत, उत्तमराव चोथे, विनय भंडारे, संतोष एखंडे, संजय लकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार बाबर म्हणाले की, येत्या २३ तारखेला आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. मतपत्रिकेवर डॉ. स्मिताताई जाधव यांचे नाव २ नंबरला असून त्यांच्यासमोर १ हा पसंतीक्रम लिहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे. सर्व कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांनी त्यांच्या प्रचारासाठी पुढे यावे, असेही आवाहन आमदार बाबर यांनी यावेळी केले.