

इस्लामपूर : तो दारू पिलेला होता... तरीही तो बस चालवत होता... याचाच अर्थ तो प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत होता... त्यातच बस चालविताना तो पाणी पीत असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत घसरून झाडाला धडकली. यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. या दारूड्या बसचालकाला सांगली कार्यालयाच्या विभागीय नियंत्रकांनी तत्काळ निलंबित केले. याबाबतचा आदेश मंगळवारी काढण्यात आला हणमंत यशवंत घोरपडे (वय 53, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) असे या चालकाचे नाव आहे.
इस्लामपूर आगाराची बस (एमएच 07 सी 9185) घेऊन सोमवारी चालक हणमंत घोरपडे व वाहक इमरान पटेल इस्लामपूर बसस्थानकातून वाघवाडी फाटामार्गे कोडोलीकडे निघाले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बस वाघवाडी येथील साखर कारखान्याच्या पुढे आली असताना, चालक हणमंत हा धावत्या बसमध्ये पाणी पीत होता. तत्पूर्वी त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. नशेत असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बस चरीत जाऊन झाडाला धडकली आणि 18 प्रवासी जायबंदी झाले होते.
अपघातानंतर उडी टाकून चालक हणमंत याने पलायन केले होते. जखमींना उपजिल्हा व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चालक हणमंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचवेळी त्याने दारू पिल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.