

इस्लामपूर : येथील ज्ञानेश पवार टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून या टोळीने दहशत निर्माण केली होती. खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, दुखापत करणे, जमाव जमवून हल्ला करणे, सावकारी आदी गंभीर गुन्हे या टोळीविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गणेशोत्सव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश भीमराव पवार (वय 24), चेतन पांडुरंग पवार (24), पंकज नामदेव मुळीक (25), प्रतीक ऊर्फ गणेश महादेव पालकर (24), युवराज दयानंद कुंभार (23), रोहन ऊर्फ वैभव सुभाष कांबळे (24) किसन ऊर्फ सोन्या संजय कुचिवाले (19), प्रेम ऊर्फ विश्वजित सुभाष मोरे (25), प्रथमेश संकाप्पा कुचिवाले, गुरुदत्त राजेंद्र सुतार (सर्व रा. इस्लामपूर) अशी कारवाई झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. टोळीतील प्रथमेश कुचिवाले, गुरुदत्त सुतार हे फरार आहेत.
23 फेब्रुवारीरोजी येथील चव्हाण कॉर्नर परिसरात पूर्ववैमनस्यातून ज्ञानेश पवार याच्या टोळीने विनोद माने याचा पाठलाग केला होता. पारळी, चाकूने त्याच्या पायावर, हातावर, चेहर्यावर वार केले होते. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. विनोद या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर टोळीतील 6 जणांना पोलिसांनी अटक केली होती. तपासादरम्यान टोळीने परिसरात दहशत निर्माण केल्याचे समोर आले. गेल्या सात वर्षात टोळीने गुन्ह्यांची मालिका निर्माण केली आहे.
इस्लामपूरसह परिसरात टोळीने दहशत निर्माण केली होती. टोळीचे सदस्यही वाढले होते. वर्चस्वासाठी टोळीने धुडगूस घातला होता. टोळीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतच निघाला होता. पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1), 3 (2), 3 (4), 4 अन्वये वाढीव कलमे लावण्यासाठी प्रस्ताव पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय हारुगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक फौजदार गणेश झांजरे, हवालदार बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, अरुण कानडे, सुशांत बुचडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले...
गेल्या 7 महिन्यांत इस्लामपुरात 5 खून झाले आहेत. त्यातील दोन सराईत गुंडांचा खून झाल्याने टोळीयुद्धाची भीती होती. आता, पोलिसांनी पवार टोळीवर मोक्का लावून इशारा दिला आहे. सण,स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या कारवाईने काहीअंशी पोलिसांचा वचक निर्माण होणार आहे.