

सांगली : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा 'संकल्पनामा' पदवीधरांच्या उन्नतीचा आहे. हा संकल्पनामा पूर्ण करण्याचा वादा महायुतीचा आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या नावासमोर पसंतीक्रम १ लिहून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली. आमदार सुधीर गाडगीळ, नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, उदय लाड, एम. आर. माने, प्रदेश प्रतिनिधी अभिजित पेडणेकर, रमेश मुळे, विकास पाटील, सुशांत शेट्टी, निखिल शिंदे, भाजपचे मंडल अध्यक्ष अमित देसाई, कृष्णा राठोड, संतोष सरगर, रवींद्र वादवणे, राहुल नवलाई व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारांसाठी व्यक्तिगत संपर्काचे नियोजन करण्यात आले. मंडल अध्यक्ष आणि प्रभारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक मंडलाची स्वतंत्र बैठक होईल. या बैठकीला संबंधित मंडल अध्यक्ष, नगरसेवक, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील. मंडलनिहाय जबाबदारी निश्चित करून मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधण्यावर भर दिला जाणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय करून नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपने केली आहे.
डॉ. स्मिता जाधव यांचा संकल्पनामा
आ. गाडगीळ म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी पदवीधरांच्या उन्नतीसाठी संकल्पनामा प्रसिद्ध केला आहे. कौशल्यावर आधारित रोजगार प्रशिक्षण, मानधनासह इंटर्नशिपच्या संधी, तालुकास्तरावर करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम तयारी, पदवीधर मतदारसंघातील ५८ विधानसभा मतदारसंघात उद्योजकतेला चालना, आपल्याच भागात रोजगाराच्या संधी, महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमता, कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, नियमित जनसंपर्क आणि कामाचा आढावा हे नऊ प्रमुख संकल्प आहेत. त्याचबरोबर तरुणाईस रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष मोहीम, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप, ग्रामीण पदवीधरांसाठी विशेष संधी, परदेशी शिक्षण व रोजगार मार्गदर्शन, वर्किंग विमेन होस्टेल्स, पदवीधरांसाठी आर्थिक साक्षरता, तरुणाईला अमली पदार्थांपासून दूर ठेवणे, पदवीधर महिलांना पाठबळ देण्याचा संकल्पही डॉ. स्मिता जाधव यांनी केला आहे. हे संकल्प पूर्ण करणे हा महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व घटक पक्षांचा वादा आहे. त्याचा निश्चितपणे पदवीधरांना लाभ होईल.