

इस्लामपूर : सांगलीतील भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अधिकृतपणे पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत जोर आला होता. मात्र, मुंबईत झालेल्या अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपा पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली.
मुंबई येथील भाजप कार्यालयात अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वास डांगे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबद्दल विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "तुमच्या मनात जो सांगलीतील भाजप प्रवेश आहे, तो अद्याप तरी झालेला नाही." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "महाराष्ट्रातील जमिनीशी जोडलेले अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनेकांना पक्षात प्रवेश देत आहेत. मात्र, जयंत पाटील यांच्या संदर्भातील प्रवेश सध्या तरी झालेला नाही." या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे.
अण्णासाहेब डांगे हे जयंत पाटील यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जयंत पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, "तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही," असे सांगितले.
राजकीय वर्तुळात अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशामुळे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. डांगे यांनी पूर्वीही भाजप, जनसंघ, जनता पक्ष, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे. आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे सांगलीतील भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही काळासाठी तरी विराम मिळाला असून, आगामी काळात राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.