

सांगली : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही; मात्र त्यांच्या राजीनाम्याचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. प्रदेश राष्ट्रवादीची बैठक मंगळवार, दि. 15 रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीत प्रदेश अध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट होईल. जयंत पाटील हेच अध्यक्षपदी कायम राहणार की, माजी मंत्री शशिकांत शिंदे नवे अध्यक्ष होणार, हे स्पष्ट होईल.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारी दुपारपासून जोरदार व्हायरल झाले. राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत राहिले. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या; मात्र राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोडसाळ असल्याचे म्हटले. पण, माजी मंत्री शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, अशीही चर्चा सुरू झाली. खुद्द शिंदे यांच्या प्रतिक्रियेने सस्पेन्स वाढला. ‘प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर ते माझे भाग्य असेल. आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन’, असे शिंदे यांनी म्हटल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात बर्याच काही घडामोडी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
जयंत पाटील यांनीही पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राजीनाम्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे शनिवारी राजीनाम्याच्या वृत्तावर राज्यभरातील अनेकांचा विश्वास बसला. सांगली जिल्ह्यातही त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताची चर्चा सुरू झाली; मात्र नेमकी माहिती राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांनाही नव्हती. दरम्यान, दुपारनंतर मात्र राजीनाम्याच्या चर्चेचा धुरळा खाली बसला. अद्याप तरी जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रदेश राष्ट्रवादीची बैठक दरमहा तिसर्या बुधवारी मुंबईत होेते. यावेळी ही बैठक मंगळवार, दि. 15 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदावर निश्चितपणे चर्चा होईल. यामुळे जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार की, शशिकांत शिंदे यांना संधी मिळणार, हे दि. 15 रोजी स्पष्ट होईल.
राजीनाम्याच्या वृत्तानंतर जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी फोन घेणे टाळले. त्यांच्या संपर्कातील नेत्यांनी मात्र जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले; मात्र साहेबांना सात वर्षे संधी मिळाली आहे. हा मोठा कालावधी आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मंगळवारच्या बैठकीत चित्र स्पष्ट होईल, असेही या नेत्यांनी सांगितले.