इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यदिनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाळवा तालुका भाजपच्या वतीने पोलीसांकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेत कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले. सर्व प्रकरणाची चौकशी करुन निर्णय घेवू असे आश्वासन पोलिसांनी दिले.
सोमवारी आ. जयंत पाटील यांनी येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी इस्लामपूर आगाराची बस काही अंतर चालवली. बस चालविण्याचा त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना त्यांनी बस चालवलीच कशी ?, चालकाने बस त्यांच्या ताब्यात दिलीच कशी? यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येवू शकला असता, असे सवाल करत भाजपने आ. जयंत पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच आगारप्रमुखांचे निलंबन व्हावे, अशी वरिष्ठांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, युवा मोर्चा इस्लामपूर अध्यक्ष सतेज पाटील, सांगली जिल्हा भाजपा चिटणीस संजय हवलदार, भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस प्रविण परीट, रामभाऊ शेवाळे, आबा मोरे, अक्षय कोळेकर, अक्षय पाटील, स्वप्नील कोरे, विकास परीट व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?