सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली आणि मिरज ही रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडविण्याची धमकी देणार्या अज्ञातावर मंगळवारी दुपारी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले की, सांगली शहर पोलिस ठाण्यात एका अज्ञाताने सोमवारी रात्री फोन केला. 'मी दहशतवादी आहे. माझ्यासोबत पाच व्यक्ती असून, त्यांच्याजवळील आरडीएक्सने रेल्वे स्टेशन्स उडविणार आहोत. मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या ठिकाणी सुद्धा आमची माणसे पोहोचली आहेत. तेथे देखील बॉम्बस्फोट करणार आहे' असे त्याने सांगितले. त्याच्या फोनची दखल घेऊन पोलिस डायरीत नोंद करण्यात आली.
वरिष्ठ अधिकार्यांना कळविण्यात आले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ मिरज रेल्वे स्टेशन येथे धाव घेतली. सांगली रेल्वे स्टेशन येथे अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कळवून नाकाबंदी लावण्यात आली. प्रत्येक संशयित वाहनाची कसून झडती घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व अॅम्ब्युलन्स व अग्निशमन यंत्रणेस आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सरकारी व खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्यास आदेशित केले आहे.
दरम्यान, सांगली व मिरज रेल्वे स्टेशनच्या परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही संशयास्पद वस्तू मिळाली नाही. या शोधमोहिमेमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, सांगली व मिरज उपविभाग, कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथक, दंगलविरोधी पथक, दहशतवादविरोधी पथक, वाहतूक शाखा, रेल्वे पोलिस पथक असे पोलिस अधिकारी व अंमलदार हजर होते.
जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणतीही संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्षास संपर्क करून माहिती द्यावी. पोलिस सर्व खबरदारी घेत असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
– संदीप शिंदे,
पोलिस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा.