नानासाहेबांमधील सृजनशीलता दिशादायक : देवेंद्र फडणवीस

नानासाहेबांमधील सृजनशीलता दिशादायक : देवेंद्र फडणवीस
Published on: 
Updated on: 

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेशी व्यक्तीगत संबंध, त्यांच्याशी आत्मियता, दातृत्व अन् संवेदनशीलता जपून स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी साकारलेली सृजनशीलता आम्हा सर्वांना यापुढील काळासाठी उत्तम दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पेठनाका येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलामध्ये स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण, वाळवा-शिराळा को-ऑप. डेअरीचा नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आणि स्मृतीग्रंथ प्रकाशन समारंभवेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर, खा. संजय पाटील, आ. नितेश राणे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, मीनाक्षीताई महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, नगरसेविका रोहिणी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते स्व. महाडिक यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन झाले.

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, सामान्य लोकांशी व्यक्तीगत व आत्मियतेने संबंध निर्माण करून स्व. नानासाहेब महाडिक यांनी आपली सृजनशीलता व संवेदनशीलता कायम जपली. नानांचे व्यक्तीमत्व कणखर व समोरच्याला चितपट करणारे होते. त्यांनी भोंड्या माळरानावर वनराई फुलवून नंदनवन केले. शिक्षण संस्था उभारून स्व. नानासाहेबांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली. या त्यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांची मुले राहुल व सम्राट महाडिक हे समर्थपणे पुढे नेत आहेत.

यावेळी सम्राट महाडिक यांनी महाडिक कुटुंबियांचा, बंधूप्रेमाचा व 11 भावंडांमधील स्नेहाचा आवर्जुन उल्‍लेख केला. त्याचा संदर्भ घेत फडणवीस यांनी महाडिक कुटुंबियांची या परिसरात मोठी ताकद निर्माण झाल्याचा उल्‍लेख केला.

प्रास्ताविकात राहुल महाडिक म्हणाले, स्व. नानासाहेबांनी उभा केलेले शिक्षण संकुल आज राज्यात नव्हे तर देशात नावारुपाला येत आहे. त्यांनी उभा केलेल्या संस्थातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. दूध संघाचे त्यांचे अधुरे स्वप्नही आज पूर्णत्वाला येत आहे. महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, प्रा. दत्तात्रय पाटील, अमोल पडळकर, डॉ. सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे कार्यकारी
संचालक प्रा. महेश जोशी यांनी आभार मानले.

माजी आ. अमल महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, राजन महाडिक, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, राहुल कदम, चेतन शिंदे, जगन्नाथ माळी, रघुनाथ बागडी आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

स्व. नानासाहेब सत्तेसोबत नव्हे तर सत्यासोबत होते…

स्व.नानासाहेब महाडिक यांच्या कर्तृत्वाचा, दातृत्वाचा दाखला देत फडणवीस यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद‍्गार काढले. ते म्हणाले, आपल्याकडे येणार्‍या गरजुंना सढळ हाताने मदत करणार्‍या नानासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक नाळ जपली. आक्रमकता, आत्मियता आणि संवेदनशीलता जपून नानासाहेब हे अखेरपर्यंत सत्तेसोबत राहण्याऐवजी ते 'सत्या'सोबत राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news