Sangli News : जिल्ह्यात 10 हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड

70 टक्के द्राक्षबागा वाया : उत्पादक शेतकरी कोलमडला : कर्जमाफीची मागणी
Sangli News
जिल्ह्यात 10 हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड
Published on
Updated on

विठ्ठल चव्हाण

तासगाव : मे महिन्यापासून सुरू झालेला पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरूच होता. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हवामानातील बदलाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे सत्तर टक्के द्राक्षबागा वाया गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षशेती उद्ध्वस्त झाली आहे. दहा हजाराहून अधिक एकर द्राक्षबागेवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालविली आहे आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत ही एक दिवसाच्या औषध खर्चाएवढीच आहे. त्यामुळे द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करायचा कुठून आणि कर्जाचा डोंगर पेलायचा कसा? या चिंतेने हतबल झालेला द्राक्ष बागायतदार शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे.

Sangli News
Sangli Crime: पेठ येथे एकाला दगडाने मारहाण, गंभीर जखमी

वर्षभर सरासरी एकरी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च केल्यानंतर द्राक्षबागेतून उत्पन्न मिळते. मात्र कोरोनाच्या काळापासून आलेल्या संकटापासून द्राक्ष बागायतदारांच्या मागे संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. मागील सलग चार वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे. अस्मानी-सुलतानी संकटांनी द्राक्ष बागायतदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पावसाळा उशिरापर्यंत सुरू होता. सतत आणि कायम पाऊस लागून राहिल्याने द्राक्षवेलीवर त्याचा चांगलाच दुष्परिणाम झाला आहे.

सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे अनेक द्राक्षबागांमध्ये फळधारणाच झाली नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत 40 टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील 80 टक्के द्राक्षबागांची फळ छाटणी झाली असून, त्यापैकी 70 टक्के द्राक्षबागांमधून फळधारणाच झाली नसल्याचे समोर आले आहे. काही द्राक्षबागांमध्ये केवळ पाच ते दहा घडसंख्या असून, अनेक ठिकाणी द्राक्षबागा पूर्णपणे वांझ झाल्याचे दिसते. अपुरी घडसंख्या टिकविणे आणि द्राक्षवेली निरोगी टिकवून ठेवण्यासाठी होणारा औषध खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे.

खरड छाटणीपासून फळपीक छाटणीपर्यंत सरासरी मजुरी, खते आणि औषधांचा एक लाख रुपयांचा खर्च प्रति एकर करावा लागतो. यंदा खरड छाटणीचा हंगाम सुरू झाल्यापासूनच पावसाळा कायम लागून राहिल्याने औषधांवर सरासरीच्या दुप्पट खर्च करावा लागला. एकरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च करूनही द्राक्षवेलीत घड तयार होऊ न शकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत. इतके होऊनही पुढचा हंगाम घ्यायचा असेल, तर वर्षभर औषधांचा खर्च शेतकऱ्यांना करावाच लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुप्पट कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.

शासनाकडून नुकतीच अवकाळी, अतिवृष्टी झालेल्या द्राक्ष बागायतदारांना एकरी 9 हजार रुपयांची तुटपुंजी मदत देण्यात आली आहे. ही मदत बागायतदारांच्या चार दिवसांच्या औषध खर्चालाही पुरेल इतपत नाही. त्यामुळे परकीय चलन मिळवून देणारी आणि लाखो हातांना रोजगार देणारी द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

जून 2026 ची वाट न पाहता, शासनाने मार्चपूर्वी द्राक्ष बागायतदारांची सरसकट कर्जमाफी करावी. तसेच, एकरी एक लाख रुपयांची तत्काळ मदत करायला हवी. तरच परकीय चलन मिळवून द्राक्षशेती टिकून राहील. शिवाय शेतकरी व शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था टिकून राहतील. अन्यथा शेतकऱ्यांबरोबरच वित्तीय संस्थाही अडचणीत येतील, हे कोणाला नाकारता येणार नाही.

Sangli News
Sangli News: 58 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर वाळवा येथील शेतजमीन अखेर मूळ मालकांच्या ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news