

सांगली : चीनमधील निकृष्ट बेदाणा अफगाणिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात आला आहे. तो सांगली, तासगावच्या बाजारपेठेतही आलेला आहे. या निकृष्ट बेदाण्याला रंग देऊन तो बाजारात आणण्याचा घाट काही व्यापाऱ्यांनी घातला आहे. यामुळे संपूर्ण बेदाणा मार्केट बदनाम होण्याचा धोका आहे. त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याला रंग देऊन तो आणला जात असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी सांगली व तासगाव येथील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ही मागणी केली. या बैठकीला सांगली बाजार समिती संचालक प्रशांत मजलेकर, बेदाणा असोसिएशनचे संचालक सुशील हडदरे, संचालक मनोज मालू, तासगाव बाजार समितीचे संचालक कुमार शेटे, स्टोअरेज असोसिएशनचे किरण बोडके उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बेदाणा व्यापारी व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांमुळेच हा व्यापार वाढलेला आहे. दुष्काळ किंवा कोणत्याही अडचणीच्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांनी एकत्रित प्रयत्न करून संकटाला सामोरे गेले आहेत. यावर्षी बेदाणा उत्पादन कमी झाल्यामुळे बेदाण्याला चांगले दर मिळेल, असे वाटत होते. मात्र चीनमधील निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तो सांगली, तासगावच्या काही व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये आणलेला आहे. हे चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आम्ही असणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी आमची भूमिका आहे. आतापर्यंत अनिल बटेजा आणि राहुल बाफना या दोन व्यापाऱ्यांची नावे पुढे आलेली आहेत. त्यांचे असोसिएशनचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. बाजार समितीचा परवानाही रद्द करण्यात येईल, प्रशासनाने कोल्ड स्टोअरेजची तपासणी करून दोषी व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
ते म्हणाले, हा आयात केलेला बेदाणा रंग देऊन तो भारतीय बेदाण्यात मिक्स करून बाजारात आणला जाण्याचा धोका आहे. जिल्हा प्रशासन व अन्न-औषध प्रशासनाने मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करावी. गेल्या काही दिवसात हा बेदाणा आल्यामुळे बेदाण्याचे दर कमी झाले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. ते थांबवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.