

सांगली : अफगाणिस्तानमधून बेकायदेशीररित्या आयात केलेला खराब आणि आरोग्यास घातक असलेला बेदाणा महाराष्ट्रातील कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवून, त्यावर प्रक्रिया करून तो भारतीय बाजारपेठेत विकणारे मोठे रॅकेट द्राक्ष बागायतदार संघाने उघडकीस आणले आहे. संघाच्या पदाधिकार्यांनी तासगाव परिसरातील कोल्ड स्टोअरेजवर छापे टाकून काही बेदाणा व्यापारी व कोल्ड स्टोअरेज मालक यांचे हे कारनामे उघड केले आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यापारी कोल्ड स्टोअरेज मालक यांच्यावर कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित करावेत, अशी मागणी बागायतदार संघाच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
गेली दोन वर्षे प्रतिकूल स्थितीमुळे भारतात द्राक्षाचे उत्पादन कमी होत आहे. यंदाही कमी प्रमाणात द्राक्षे येणार आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादनही कमी होणार आहे. उत्पादन घटल्यामुळे बेदाण्याचे दर वाढलेले आहेत. या वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी अफगाणिस्तानमधील निकृष्ट बेदाणा छुप्या पद्धतीने भारतात आयात करण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक कोल्ड स्टोअरेजमध्ये तो आलेला आहे. हा बेदाणा वॉश करून त्याला कृत्रिम रंग देऊन तो पुन्हा भारतीय बाजारात आणण्याचा काही व्यापारी आणि कोल्ड स्टोअरेज मालक यांचा डाव आहे. हा डाव संघाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी उधळून लावला. संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील तसेच काही संचालक यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन अफगाणिस्तानमधून आलेले बेदाणा बॉक्स उघड केले. त्यांनी तासगाव बाजार समितीच्या संचालकांना बोलावून ही माहिती सांगितली. त्यावेळी हा निकृष्ट व काळा बेदाणा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, त्यांचे व्यापारी परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली आहे
अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा बेदाणा छुप्या मार्गाने महाराष्ट्रात आणला गेला. हा बेदाणा मुळात खराब झालेला असून, त्याला पुन्हा झळाळी देण्यासाठी त्यावर बेकायदा वॉशिंग आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जात आहे. हा विषारी बेदाणा भारतीय बेदाणा म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्याचा डाव काही व्यापार्यांनी रचला होता. मात्र तो संघाच्या पदाधिकार्यांनी उधळून लावला आहे.
दर पाडण्यासाठी व्यापार्यांचा डाव
काही दिवसात नवीन बेदाणा हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने दर जास्त राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाहेरील निकृष्ट बेदाणा आयात करून, जास्त माल आहे असे दाखवून दर पाडण्याचा व्यापार्यांचा डाव असावा, असा आरोप द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकार्यांनी केला आहे.