

तासगाव शहर : चिनी बेदाणा अफगाणिस्तानमार्गे आणून भारतीय लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी सोमवारी तासगाव येथील कोल्ड स्टोअरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी बटेजा कोल्ड स्टोअरेज आणि राधिका कोल्ड स्टोअरेज या दोन्ही स्टोअरेज मालकांनी माफीनामा लिहून दिला. ‘आम्ही चुकलो, पुन्हा अशी चूक करणार नाही. बेदाणा आयात करणार नाही, कुणी करायला लागला तर त्याला पाठीशी घालणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो’, असा माफीनामा दोघांनीही लिहून दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेकडो द्राक्ष उत्पादकांनी चिनी बेदाण्याविरोधात लढा उभारला होता. याप्रश्नी सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी संभाजी कुंभार, सुनील पोतदार, वहाब मुलाणी, नितीन गोरे, आर. डी. पाटील, संजय खोलखुंबे, श्रीधर उदगावे, निवृत्ती शिंदे, अनिल शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसंतदादा कॉलेजपासून मोर्चाला सुरुवात झाली. तब्बल पाच किलोमीटर चालत मोर्चा बटेजा कोल्ड स्टोअरेजपर्यंत आला. या ठिकाणी बटेजा यांनी लेखी माफीनामा देऊन ‘आमची चूक झाली आहे’ अशी कबुली दिली. तसेच ‘यापुढे अशी चूक करणार नाही. आयात करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो’, अशी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर मोर्चा बाफना यांच्या कोल्ड स्टोरेजवर आला. त्या ठिकाणीही बाफना यांनी माफीनामा लिहून दिला. त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, चार वर्षांपासून द्राक्ष बेदाणा उत्पादकाची वाईट परिस्थिती आहे. अत्यंत कमी बेदाणा तयार होतो आहे. त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे भारतात आणला. तो भारतीय बॉक्समध्ये भरून भेसळ करून विकला. दर पाडण्याचे षडयंत्र काही व्यापाऱ्यांनी सुरु केले. हा बेदाणा रंगे हाथ पकडण्याचे काम द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी केले. तरीही व्यापारी ही चोरी कबूल करायला तयार नव्हते. त्यामुळेच त्यांच्या स्टोअरेजवर मोर्चा काढला. बाजार समितीनेही त्यांचे परवाने तात्पुरते रद्द केले आहेत. मात्र त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द व्हावेत. बेदाण्याची आयात पूर्णपणे थांबावी, यासह अन्य मागण्यासाठी संघर्ष सुरूच राहील.
शेतकरी आर. डी. पाटील म्हणाले, बाजार समितीने या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. आता तात्पुरते परवाने रद्द केले आहेत. ते कायमस्वरूपी रद्द करावेत. याबाबत बाजार समितीलाही निवेदन देण्यात आले. यावेळी सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, भूजंग पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, निशिकांत पोतदार, इम्रान पटेल, सागर पाटील, बाळासाहेब खरमाटे, बाळासाहेब लिंबेकाई, अन्नू माळी यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.