Chandrakant Patil : सत्तेत काँग्रेस सोडून सर्वांना बरोबर घेऊ

चंद्रकांत पाटील : शिवसेनेबरोबर बोलणी चालू; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही ऑफर
Chandrakant Patil |
Chandrakant Patil Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : सांगली महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बहुमत आहे. महापालिकेतील सत्तेत शिवसेनेलाही बरोबर घेणार आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीत यायची तयारी दर्शवली तर त्यांना सत्तेत काय हवे आहे आणि आम्ही काय देऊ शकतो, ते पाहू. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस सोडून सर्वांना बरोबर घेऊ, असे भाजपचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी युतीतर्फे महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी (भाजप) व उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, भाजपचा महापौरपदाचा उमेदवार पक्षाच्या कोअर कमिटीतील सर्व सदस्यांनी एकमताने निवडला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मान्यता घेतली आहे. त्यानुसार भाजपचे धीरज सूर्यवंशी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन मगदूम यांचाही उमेदवारी अर्ज भरला आहे. काही महापालिकांमध्ये सव्वा-सव्वा वर्षे महापौरपद दिलेले आहे. पण सांगलीत महापौरपद सव्वा वर्षासाठी की अडीच वर्षासाठी हे काळाच्या ओघात ठरवू, असेही ते म्हणाले.

महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे. भाजपचे 39 व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 16 असे एकूण 55 संख्याबळ झाले आहे. शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. त्यांनाही बरोबर घेणार आहोत. त्यांना सत्तेत काय द्यायचे, हे ठरवणार आहोत. त्यासंदर्भात बोलणे सुरू आहे. त्यामुळे भाजप महायुतीची संख्या 57 होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपसोबत यायचे ठरवले तर त्यांना काय हवं आहे, तेही पाहू. त्यांना काय देऊ शकतोय, ते पाहू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही महापालिकेत महायुतीसोबत आल्यास संख्याबळ 60 होते. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस सोडून सर्व पक्षांना घेऊ. स्थायी समितीचे सभापतीपद कोणाला द्यायचे, अन्य सभापतीपदे कोणाला द्यायची, स्थायी समितीत कोण-कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोणाला करायचे, हे ज्या-त्या वेळी ठरवले जाईल. त्यासंदर्भात फार आधी विचार करणे राजकीय असंमजसपणाचे ठरेल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news