

विश्वास गुरव
चिंचणी : यशवंतराव चव्हाण वन्यजीव सगरेश्वर अभयारण्य हे हरणांसाठी आणि काळवीटांसाठी प्रसिद्ध तर आहेच, मात्र हिवाळ्यात या अभयारण्यातील जलाशयांवर चक्रवाक म्हणजेच ‘रुडी शेलडफ’ या देखण्या स्थलांतरित पक्षाचे आगमन झाले आणि परिसर अधिक नयनरम्य झाला.
देवराष्ट्रे व परिसरातील सागरेश्वर अभयारण्य हे मानवनिर्मित अभयारण्याचा उत्तम नमुना असून येथे शेकडो हरणांचा मुक्तसंचार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आहे. हे अभयारण्य 150 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्ष्यांनी समृद्ध असून केवळ वनचरच नव्हे, तर येथील परिसरातील पाणवठ्यांवरील सौंदर्यही आता जास्त उजळून निघाले आहे. विशेष करून अभयारण्यातील राम मंदिराशेजारील असलेल्या पाझर तलावात या चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्यांचे दर्शन होऊ लागले आहे. या जोड्यांच्या आगमनाने अभयारण्यातील जलाशयाची शोभा वाढली असून सागरेश्वर अभयारण्य तसेच परिसरातील इतर जलस्रोतांकडेही हे पक्षी आकर्षित होत आहेत. त्या परिसरातून ताकारी कॅनॉल व कुंभारगाव तलाव येथे चक्रवाकचे अस्तित्व सातत्याने दिसून येत आहे.