

देवराष्ट्रे : स्व. यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये चितळ व सांबर जातीच्या हरणांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींसाठी हे दिलासादायक चित्र आहे. काही दिवसांपासून वन्यजीव विभागाने अभयारण्यामध्ये पाणी व ओल्या चार्याची सोय केल्याने या दिवसांत अभयारण्याबाहेर पडणार्या प्राण्यांच्या संख्येत तुलनेने घट झाल्याचे दिसून येत आहे.
सागरेश्वर अभयारण्याची ओळख हरणांचे माहेरघर म्हणून केली जाते. मात्र डिसेंबर ते जून दरम्यान अभयारण्यात ओल्या चार्याची व पाण्याची गैरसोय होत असल्याने अनेक प्राणी या काळात अभयारण्याबाहेर पडत असल्याचे दिसून येत होते. मात्र कोल्हापूर वन्यजीव विभागाने मागील काही महिन्यांपासून अभयारण्यामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करून विहिरीवरती सौरपंप बसवले आहेत. याद्वारे पाणी उपसा करून पाणवठे भरून घेतले जात आहेत. याशिवाय ताकारी योजनेच्या पाण्याने बंधारे भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. बाहेरून ओला चारा खरेदी करून तो प्राण्यांना दिला जात आहे.
अभयारण्यामध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यामध्ये 540 चितळ, तर 495 सांबर दिसून आले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या समाधानकारक अशी आहे. तसेच हरणांची घनताही जास्त असल्याचे आढळून आल्याने वन्यजीव प्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. प्राणी गणनेसाठी अभयारण्याच्या परिसरामध्ये 27 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे तसेच 21 ठिकाणी ट्रान्झेक्ट लाईनचा वापर करण्यात आला आहे. याकामी वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्टचे गिरीश पंजाबी व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभल्याची माहिती विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी दिली.