Raju Shetti| ग्रामीण संस्कृती संपविणारा शक्तिपीठ रद्दच करा

राजू शेट्टी यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Raju Shetti |
Raju Shetti File Photo
Published on
Updated on

विटा : शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आणि ग्रामीण संस्कृती संपवणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगली जिल्ह्यात आता संघर्षाची पुढची ठिणगी पडणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एल्गार’ मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

येथील श्रेयस भवन येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, दीपक लाड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार, राजेंद्र जगताप यांच्यासह महिला आणि बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले, हा मोर्चा दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाईल. या आंदोलनात आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, सतेज पाटील, रोहित पवार आणि रविराज साबळे सहभागी होणार आहेत. हा मोर्चा केवळ एका पक्षाचा नसून सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आवाज असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, या महामार्गासाठी अंदाजे १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ४० ते ४२ हजार कोटी रुपयांत हा रस्ता पूर्ण होऊ शकतो, असा दावा शेट्टी यांनी केला आहे. वरचे ६० ते ६५ हजार कोटी रुपये खिशात घालण्यासाठी हा घाट घातला जात आहे. हा होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असून, तो सध्या केवळ २५ टक्के क्षमतेने वापरला जात आहे. असे असताना नवीन महामार्गाची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. या नव्या महामार्गामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. शिवाय, हा प्रकल्प पूर्णपणे बँक कर्जावर आधारित असून, भविष्यात प्रवाशांकडून अवाच्या सवा टोल वसूल करून जनतेची लूट केली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मोजणीसाठी येणाऱ्या खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू दिले जाणार नाही आणि घटनादत्त अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news