Koyna water diversion to Mumbai|कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव रद्द करा : ॲड. बाबासाहेब मुळीक

कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव रद्द करा : ॲड. बाबासाहेब मुळीक
Koyna water diversion to Mumbai
विटा - येथील पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. बाबासाहेब मुळीक
Published on: 
Updated on: 

विटा : पुढारी वृत्तसेवा

कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा आणि कोयना जलाशयातील पाणी जलविद्युत निर्मिती ऐवजी कृष्णा खोऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वळवावे, अशी मागणी ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई आणि महानगर क्षेत्राच्या आगामी ५० वर्षांच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती नंतरचे पाणी मुंबईकडे वळविण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चांवर आता पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात ॲड. मुळीक यांनी म्हटले आहे की, मुंबई आणि महानगर क्षेत्राच्या आगामी ५० वर्षांच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती नंतरचे पाणी मुंबईकडे वळविण्याचे नियोजन सुरू आहे. मुळात कोयना धरणाचे काम १९५६ मध्ये सुरू होऊन ते १९६४ मध्ये पूर्ण झाले. त्या काळी वीजनिर्मिती ही राज्याची तातडीची गरज असल्याने बोगद्याद्वारे पाणी वशिष्ठी नदीत सोडून जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. १९६४ च्या दरम्यान धरणातील एकूण ११० टीएमसी पाण्यापैकी ६७.५० टीएमसी पाणी जलविद्युत निर्मितीसाठी, तर ४२.५० टीएमसी पाणी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी व शेतीसाठी निश्चित करण्यात आले होते.

पुढच्या काळात पाटण, कराड, ईश्वरपूर, विटा, पलूस, तासगाव या शहरांसह कुंडल, मणेराजुरी, कासेगाव या प्रादेशिक योजना तसेच नदीकाठच्या अनेक गावाच्या पिण्याच्या पाणी योजना उभ्या राहिल्या. पाटण, कराड, ईश्वरपूर, विटा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज तालुक्यातील शेतकरी परवाना घेऊन शेतीसाठी पाणी वापरत आहेत.

याशिवाय दुष्काळी भागासाठी ताकारी (९.३४ टीएमसी), टेंभू (२२.०३ टीएमसी पैकी १८ टीएमसी कोयनेतून) आणि विस्तारित टेंभू (८ टीएमसी) अशा उपसा सिंचन योजनांद्वारे कोयनेच्या एकूण ३४.३५ टीएमसी पाण्यावर शेतीचे नियोजन झाले आहे.

पवन-सौर ऊर्जेचा पर्याय आणि 'रायपेरीयन राईट'चा मुद्दा पूर्वी वीजनिर्मितीसाठी जलविद्युत हा प्रमुख पर्याय होता, मात्र आज सातारा आणि सांगली जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जेतून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होत आहे. दोन्ही जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जेसाठी आणखी जागा उपलब्ध असून, वैयक्तिक स्तरावरही सौर ऊर्जेकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी जलविद्युत हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. नदी, नाला, ओढा किंवा तलावालगत जमीन असलेल्या व्यक्तीला किंवा शेतकऱ्याला त्या पाण्याचा वापर करण्याचा नैसर्गिक अधिकार म्हणजेच 'रायपेरीयन राईट' होय.

Koyna water diversion to Mumbai
Kolhapur Sangli Road | कोल्हापूर-सांगली रुंदीकरणास भूसंपादनाचा खोडा

यानुसार नैसर्गिक उतारानुसार कोयना धरणाच्या पाण्या वर सातारा व सांगली जिल्ह्याचाच अधिकार असून, या पाण्यावर मुंबईचा कोणताही हक्क नाही, असा ठाम मुद्दा ॲड. मुळीक यांनी मांडला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांची आगामी ५० वर्षांतील वाढती लोकसंख्या आणि शेतीची गरज लक्षात घेता, कोयनेतील ४२.५० टीएमसी पाणीच या भागाला अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकडे पाणी वळविण्याचा प्रस्तावच रद्द करा आणि कोयना जलाशयातील पाणी कृष्णा खोऱ्याकडे पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती ॲड. मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Koyna water diversion to Mumbai
Sangli News| सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड बिनविरोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.