Sangli News| सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड बिनविरोध

उपाध्यक्षपदी तानाजी पाटील; २९ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा
Sangli District Bank
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड बिनविरोध
Published on: 
Updated on: 

​सांगली : ​सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संचालक तानाजी पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर बँकेच्या आवारात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. या निवडीमुळे १९९७ नंतर तब्बल २९ वर्षांनी सांगली जिल्हा बँकेत काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले असून, महाविकास आघाडीने बँकेवरील सत्ता कायम राखली.

​बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी दुपारी तीन वाजता संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजिली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

लाड यांच्या अर्जावर माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी सूचक म्हणून, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. तानाजी पाटील यांच्या अर्जावर अमोल बाबर सूचक, तर माजी खासदार संजय पाटील अनुमोदक होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भाजपने एकही अर्ज दाखल न करता माघार घेतली.

निवडीनंतर लाड व पाटील यांचा माजी खासदार विशाल पाटील, बँकेचे मावळते अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, देवराज पाटील, वैभव शिंदे, संभाजी कचरे, विराज नाईक, सतीश देशमुख, के. डी. कांबळे, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, रणधीर नाईक, संचालिका पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव, अण्णासाहेब कोरे यांनी सत्कार केला. यावेळी जितेश कदम, माजी आमदार विक्रम सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेतही झेडपी ‘पॅटर्न’ची पुनरावृत्ती

​जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांतील काही सदस्यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे तेथे आघाडीची सत्ता आली होती. आता जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांच्या संचालकांनी महाविकास आघाडीला साथ दिली आहे. स्थानिक पातळीवरील या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व अबाधित राहिले.

शिवसेना, राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली

​सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक सहा संचालक निवडून आले आहेत. त्याखालोखाल भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे तीन संचालक आहेत. महायुती एकत्र राहिली असती, तर भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकत्रित संख्याबळ ११ झाले असते आणि त्यांची सत्ता सहज आली असती. मात्र, महायुतीत फूट पडली. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे दोन, तर शिवसेनेचे (शिंदे गट) तीनही संचालक महाविकास आघाडीसोबत गेल्याने आघाडीचे संख्याबळ वाढले आणि सत्तांतर टळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.